ऑनलाइन लोकमत
उफा ( रशिया) दि. १० - सार्क शिखर परिषदेत सहभागी होण्यासाठी पंतप्रधान नरेंद्र मोदी २०१६मध्ये पाकिस्तानच्या दौ-यावर जाणार आहेत, अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिवांनी दिली आहे. रशियातील एससीओ शिखर परिषदेदरम्यान पंतप्रधान नरेंद्र मोदी व पाकिस्तानचे पंतप्रधान नवाज शरीफ यांची भेट झाली. सुमारे तासभर चाललेल्या या बैठकीत दोन्ही नेत्यांनी दहशतवादासह अनेक मुद्यांवर चर्चा केली. त्यानंतर भारत व पाकिस्तानच्या परराष्ट्र सचिवांतर्फे संयुक्त पत्रकार परिषद घेण्यात आली.
'अत्यंत सौहार्दपूर्ण वातावरणात झालेल्या बैठकीदरम्यान पाकिस्तानचे पंकप्रधान नवाज शरीफ यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदींना ' सार्क शिखर परिषदेत' सहभागी होण्याचे निमंत्रण दिले व पंतप्रधान मोदींनीही त्याचा स्वीकार केला असून २०१६ साली ते पाकिस्तानला जाणार आहेत', अशी माहिती भारताचे परराष्ट्र सचिव एस. जयशंकर यांनी दिली. ' बैठकीदरम्यान दोन्ही नेत्यांनी दहशतवादासह अनेक महत्वाच्या मुद्यांवर चर्चा करत दहशवादाचा निषेध केला. दहशतवादासंदर्भातील सर्व मुद्यांवर चर्चा करण्यासाठी दिल्लीत लवकरच दोन्ही देशांमध्ये सचिव स्तरावर चर्चा होणार आहे. तसेच मुंबईवर २६/११ रोजी झालेल्या हल्ल्यातील आरोपींच्या आवाजाचे नमुने भारताला सोपवण्यात येणार आहेत, असे एस. जयशंकर यांनी सांगितले.
या बैठकीत दोन्ही देशांच्या विकासाबाबतही चर्चा करण्यात आली. तसेच पकडण्यात आलेल्या दोन्ही देशांच्या मच्छिमारांची बोटींसह येत्या १५ दिवसांत सुटका करण्याचा निर्णय घेण्यात आल्याचे पत्रकार परिषदेदरम्यान सांगण्यात आले.