लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : नवीन वर्षात लाडक्या बहिणींसाठी सरकारने भाऊबीजेच्या दिवशी म्हणजे गुरुवार, २३ ऑक्टोबर रोजी सुटी जाहीर केली आहे. त्यामुळे दिवाळीची सलग तीन दिवस सुटी मिळणार आहे. दरवर्षी २४ सुट्या मिळतात; परंतु पुढल्या वर्षी भाऊबीजेला सुटी दिल्याने एकूण सुट्या २५ मिळणार आहेत, अशी माहिती ज्येष्ठ पंचांगकर्ते दा. कृ. सोमण यांनी दिली.
होळीची सुटी शुक्रवारी, १४ मार्चला आहे. रमजान ईदची सुटी सोमवार, ३१ मार्चला आहे. डाॅ. बाबासाहेब आंबेडकर जयंतीची सुटी सोमवार, १४ एप्रिलला आहे. गुडफ्रायडेची सुटी शुक्रवार, १८ एप्रिलला आहे. बुद्ध पौर्णिमेची सुटी सोमवार, १२ मे रोजी आहे. बकरी ईदची शनिवार, ७ जूनला आहे. स्वातंत्र्य दिन शुक्रवार, १५ ऑगस्टला आहे.
ईद-ए-मिलाद शुक्रवार, ५ सप्टेंबरला आहे. या सुट्या शनिवार-रविवारला जोडून आल्याने चाकरमान्यांना बाहेरगावी सहलीसाठी जायचे नियोजन करता येणार आहे. परंतु प्रजासत्ताक दिन, गुढीपाडवा, श्रीरामनवमी, मोहरम या चार सुट्या रविवारी आल्याने त्या बुडणार आहेत, असे सोमण यांनी सांगितले.