नवी दिल्ली: स्वातंत्र्य दिनापूर्वी राष्ट्रीय तपास यंत्रणेला (NIA) मोठे यश मिळाले आहे. एनआयएने राजधानी दिल्लीतील बाटला हाऊस येथून प्रतिबंधित दहशतवादी संघटना ISIS शी संबंधित एका संशयिताला अटक केली आहे. अटक करण्यात आलेला संशयित हा इसिसचा कट्टर आणि सक्रिय सदस्य आहे.
मोहसीन अहमद असे संशयिताचे नाव असून तो बिहारचा रहिवासी आहे. हा व्यक्ती ISIS ऑनलाइन प्रचार करत होता. काही काळ तो बाटला हाऊसमध्येही राहिला आहे. मोहसीन भारत आणि परदेशातील ISIS बद्दल सहानुभूती असलेल्या लोकांकडून निधी गोळा करायचा. यासाठी त्याने क्रिप्टोकरन्सीचाही वापर केला आहे.
एनआयएनुसार अहमद हा कट्टरपंथी आणि इसिसचा सक्रिय सदस्य आहे. भारत आणि परदेशातील सहानुभूतीदारांकडून ISIS साठी निधी गोळा करण्यात सहभाग असल्याबद्दल त्याला अटक करण्यात आली आहे. एनआयएच्या पथकाने अहमदच्या बाटला येथील घरावर छापा टाकला. छाप्यादरम्यान त्याच्या घरातून अनेक गुन्ह्यांची कागदपत्रे सापडली आहेत. याप्रकरणी पुढील तपास सुरू आहे