नवी दिल्ली : समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोटप्रकरणी मुख्य आरोपी असीमानंद यांच्यासह सर्व आरोपींची मुक्तता करण्याचा निर्णय पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयाने दिला आहे.
12 वर्षांपूर्वी झालेल्या समझौता एक्स्प्रेस बॉम्बस्फोटप्रकरणी बुधवारी पंचकुलामधील विशेष एनआयएच्या न्यायालयात सुनावली झाली. या सुनावणीत बॉम्बस्फोट प्रकरणातील मुख्य आरोपी असीमानंद, लोकेश शर्मा, कमल चौहान आणि राजेंदर चौधरी यांची निर्दोष मुक्तता न्यायालयाने केली आहे.
दिल्लीहून लाहोरला जाणाऱ्या समझौता एक्स्प्रेसमध्ये बॉम्बस्फोट झाला होता. यात 68 लोकांना जीव गमवावा लागला आणि 12 जण गंभीर झाले. मृत्युमुखी पडलेल्यांमध्ये अधिक जण पाकिस्तानी नागरिक होते. या प्रकरणात 2010 साली असीमानंद यांना अटक करण्यात आली होती. त्यानंतर त्यांची जामीनावर सुटका करण्यात आली होती.
दरम्यान, 2006 ते 2008 या दोन वर्षाच्या काळात समझौता एक्स्प्रेस, हैदराबादमधील मक्का मशिद, अजमेर दरगाह आणि मालेगावमधील दोन स्फोट घडवण्यात आले होते. या स्फोटांमध्ये 119 लोकांचा बळी गेला. या सर्व बॉम्बस्फोटांमध्ये असीमानंद यांचा सहभाग असल्याचा आरोप करण्यात आला होता. तसेच, या बॉम्बस्फोटामागे हिंदुत्ववादी संघटना असल्याचा दावा करण्यात आला होता.