नवी दिल्ली : दिल्ली विद्यापीठातील माजी प्राध्यापक एसएआर गिलानी यांना मंगळवारी पोलिसांनी देशद्रोहाच्या आरोपाखाली अटक केल्यामुळे जेएनयूमधील वाद आणखी चिघळला आहे. दुसरीकडे जेएनयूमधील देशद्रोहाच्या कृत्याचा एनआयएमार्फत तपास करण्याची विनंती करणारी याचिका दिल्ली उच्च न्यायालयाने फेटाळली आहे. आज शिक्षकांनीही वर्गावर बहिष्कार घालत त्यांना समर्थन दिल्यामुळे विद्यापीठातील तणावात भर पडली आहे. विद्यापीठात वार्तांकनासाठी गेलेल्या पत्रकारांवर हल्ला करण्यात आल्याच्या निषेधार्थ शेकडो पत्रकारांनी निषेध मार्च काढत लक्ष वेधले. त्यांनी केंद्रीय गृहमंत्री राजनाथ सिंह यांची भेटही घेतली. जेएनयूमधील आंदोलनाला पाठिंबा देण्यासाठी पश्चिम बंगालमधील जादवपूर विद्यापीठातील विद्यार्थ्यांनी मंगळवारी आंदोलन केले, त्या वेळी तेथेही काही विद्यार्थ्यांनी अफझल गुरू समर्थनाच्या घोषणा दिल्याने पश्चिम बंगालमधील वातावरणही तापले आहे. काही विद्यार्थ्यांनी आंदोलनाच्या वेळी ‘अफझल बोले आझादी, गिलानी बोले आझादी, जब काश्मीर ने मांगी आझादी, मणिपूर भी बोले आझादी’ अशा घोषणा दिल्या. जेएनयूमधील ९ फेब्रुवारी रोजीच्या घडामोडीबाबत दिल्ली पोलीस तपास करीत असून, त्यांना पहिल्यांदा तपास करू द्या. आवश्यकता भासल्याखेरीज आम्ही त्यांना रोखणार नाही. एनआयएकडून तपासाबाबत विनंती करणारी याचिका सध्याच्या टप्प्यात अपरिपक्व ठरते, असे न्या. मनमोहन यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले.
एनआयएकडून तपास नाही
By admin | Published: February 17, 2016 3:31 AM