नवी दिल्ली : धर्मांतर करून हिंदू तरुणीशी करण्यात आलेला विवाह ‘हा लव जिहाद’चा प्रकार असल्याचे सांंगत केरळ उच्च न्यायालयाने हा विवाह रद्द केल्याचे प्रकरण आता सर्वोच्च न्यायालयात पोहोचले आहे. न्यायालयाने याप्रकरणी राष्टÑीय तपास संस्थेला (एनआयए) या कथित लव जिहाद प्रकरणी चौकशी करून अहवाल सादर करण्याचे आदेश दिले.सरन्यायाधीश जे. एस. खेहर आणि न्या. धनंजय चंद्रचूड यांच्या न्यायपीठाने एनआयएच्या अहवाल आल्यानंतर याप्रकरणी विचार करणार असल्याचे स्पष्ट केले. शफीन जहान या तरुणाने दाखल केलेल्या याचिकेवर न्यायालयाने एनआयएला चौकशी आदेश दिले आहेत. अतिरिक्त सॉलिसिटर जनरल मनिंदर सिंह यांनी सांगितले की, अशाच प्रकारे आणखी एक प्रकरण आले होते. ही प्रकरणे एकाच संघटनेशी संबंधित आहेत.केरळ सरकारने एनआयए चौकशीला हरकत नसल्याचे स्पष्ट केले. सर्वोच्च न्यायालयाचे निवृत्त न्यायाधीश आर. व्ही. रवींद्रन यांच्या देखरेखीखाली चौकशी केली जाईल, असे न्यायपीठाने सांगितले. शफीन जहान याने केरळ हायकोर्टाचा आदेश रद्दबातल ठरविण्याची मागणी केली आहे. केरळ उच्च न्यायालयाने विवाह अवैध ठरवत तरुणीची रवानगी आई-वडिलांकडे केली. मुलीच्या वडिलांनी विवाह रद्द ठरविण्याची विनंती केली होती. मात्र, संबंधित मुलीचे म्हणणे ऐकून घ्यावे, अशी विनंती अॅड. कपिल सिब्बल यांनी केली.
‘लव जिहाद’ची एनआयए चौकशी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 17, 2017 4:29 AM