नवी दिल्ली : श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्याप्रकरणी राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) तामिळनाडूतील तीन संशयितांच्या घरावर छापा टाकला आहे. आज सकाळी सहा वाजता कोच्चीहून एनआयएचे अधिकारी कोयंबत्तूरला पोहोचले. त्यानंतर ठिकठिकाणी छापेमारी केली. सुत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, एनआयएच्या अधिकाऱ्यांनी पोथनूरमध्ये अझरुद्दीन उक्कदम, सद्दाम, अकबर यांच्यासह कुणियामथूरमध्ये अबुबकर सिद्दीक आणि अल अमीम कॉलोनीत इधियाथुल्ला यांच्या घरावर छापा टाकला असून चौकशी सुरु आहे.
श्रीलंकेत झालेल्या बॉम्ब हल्ल्यानंतर भारत आणि श्रीलंकने पाच संशयितांचे फोन नंबर शेअर करण्यात आले होते. या संशयितांचा संबंध 'आयएस' या दहशतवादी संघटनेशी असल्याचे सांगण्यात येत आहे. भारताने सुद्धा काही अशा लोकांचे नंबर शेअर केले होते, जे श्रीलंकेतील दोन फिदायिनांच्या कुटुंबियांच्या संपर्कात होते. दरम्यान, एनआयएची टीम काही दिवसांपूर्वी आयएसच्या संशयितांची माहिती घेण्यासाठी श्रीलंकेला गेली होती. या माहितीच्या आधारावर एनआयएच्या अधिकाऱ्यांनी आज कोयंबत्तूरमध्ये छापेमारी केली असून यासंबंधी तपास सुरु केला आहे.
श्रीलंकेतील ईस्टर रविवारी झालेल्या बॉम्ब हल्ल्याचा मास्टरमाइंड तामीळ बोलणारा कट्टर मौलवी जेहरान हाशिम असल्याचे सांगण्यात येत आहे. मौलवी जेहराम हाशिम गेल्या तीन वर्षांपासून दक्षिण भारतातील 'आयएस' दहशतवादी संघटनेच्या संशयित लोकांच्या संपर्कात होता. तसेच, एक 'आयएस' मॉड्यूल तयार करण्यास मदत करत होता. याशिवाय मौलवी जेहराम हाशिमने सोशल मीडीयाच्या माध्यमातून आयएस दहशतवादी संघटनेत सामील होणाऱ्या केरळ आणि तामिळनाडूमधील लोकांशी संपर्क साधला.
दरम्यान, जगभरात ईस्टर संडे साजरा होत असताना 21 एप्रिलला श्रीलंकेमधील कोलंबो येथे चर्च आणि हॉटेलना लक्ष्य करून आठ ठिकाणी बॉम्बस्फोट झाले. कोलंबो येथे झालेल्या साखळी बॉम्बस्फोटात 359 हून अधिक जणांचा मृत्यू झाला तर 500 हून अधिक जण जखमी झाले. या घटनेनंतर संपूर्ण श्रीलंकेत भीतीचे वातावरण पसरले. या बॉम्बस्फोटानंतर श्रीलंकेत बुरख्यासह चेहरा झाकणाऱ्या प्रत्येक गोष्टींवर बंदी घालण्यात आली आहे. श्रीलंकेचे राष्ट्रपती मैत्रीपाला सिरिसेना यांनी हा निर्णय घेतला असून ट्विटरवरून याची माहिती देण्यात आली होती. श्रीलंकन सरकारने 'चेहरा झाकणाऱ्या कोणत्याही गोष्टींमुळे व्यक्तिची ओळख पटण्यास अडचणी येऊ नयेत म्हणून आपत्कालीन नियमांच्या अंतर्गत अशा गोष्टींवर प्रतिबंध केला जात आहे.