लोकमत न्यूज नेटवर्क, नवी दिल्ली : जागतिक दहशतवादी संघटना इस्लामिक स्टेटने भारतात आपल्या कारवाया वाढविण्याच्या रचलेल्या कटाचा पर्दाफाश करण्यासाठी सुरू असलेल्या तपासाचा एक भाग म्हणून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) मध्य प्रदेश आणि महाराष्ट्रामध्ये पाच ठिकाणी धाडी टाकल्या, अशी माहिती एका अधिकाऱ्याने रविवारी दिली.
संशयित व्यक्तींच्या घरांची सिवनी (मध्य प्रदेश) येथील चार ठिकाणी आणि पुणे (महाराष्ट्र) येथील एका ठिकाणी वेगवेगळ्या पथकांनी झडती घेतली, असे एनआयएच्या प्रवक्त्याने सांगितले. तपासात प्राप्त माहितीच्या आधारे एनआयएच्या पथकांनी इस्लामिक स्टेट-खोरासान प्रांत (आयएसकेपी) प्रकरणातील संशयित तल्हा खान (पुणे) व सिवनी येथील अक्रम खान यांच्या घरांची झडती घेतली. दिल्लीतील ओखला येथून जहांजैब सामी वानी आणि त्याची पत्नी हिना बशीर बेग या काश्मिरी जोडप्याला अटक केल्यानंतर दिल्ली पोलिसांच्या विशेष शाखेने सुरुवातीला हा गुन्हा दाखल केला होता. हे जोडपे आयएसकेपीशी संबंधित असल्याचे आढळले होते, असे प्रवक्त्याने सांगितले. आणखी एक आरोपी अब्दुल्ला बाशीथची भूमिका समोर आली. बाशीथ अन्य एका प्रकरणात आधीच तिहार तुरुंगात आहे, असे अधिकाऱ्याने सांगितले. शिवमोग्गा इस्लामिक स्टेट कटप्रकरणी एनआयएने सिवनीमधील इतर तीन ठिकाणांचीही झाडाझडती घेतली.
सर्व ठळक बातम्यांसाठी जरूर वाचा महाराष्ट्रातील अव्वल मराठी वेबसाईट "लोकमत डॉट कॉम"