जम्मू : अनधिकृतपणे सीमेपलीकडे व्यापार केल्याच्या आरोपावरून राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) रविवारी जम्मू आणि काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी छापे घातले. या व्यापारातून येणारा पैसा हा दहशतवादी कारवायांसाठी वापरला जात होता. “एनआयएने जम्मू आणि काश्मीर पोलीस, केंद्रीय राखीव पोलीस दल (सीआरपीएफ) आणि आयटीबीपीच्या (इंडो-तिबेट बॉर्डर पोलीस) मदतीने रविवारी पूंछ जिल्ह्यात नियंत्रण रेषेवरील संशयित व्यापाऱ्यांच्या ९ ठिकाणी सीमेपलीकडील व्यापारासंदर्भात छापे घातले,” असे अधिकृत प्रवक्त्याने म्हटले.
एनआयएने ९ डिसेंबर, २०१६ रोजी बेकायदा कारवाया (प्रतिबंध) कायदा, १९६७ अंतर्गत गुन्हा दाखल केला होता. २००८ मध्ये नियंत्रण रेषा व्यापार सुरू झाला तो जम्मू आणि काश्मीर आणि पाकिस्तान व्याप्त काश्मीर यांच्यात चांगले संबंध निर्माण व्हावेत या उद्देशाने. हा व्यापार वस्तू विनिमयावर (बार्टर सिस्टम) आधारित होता. त्यात त्रयस्थ माध्यमातून आलेल्या वस्तूंना मान्यता नव्हती.
रविवारी घातलेले छापे हे पाकिस्तानातून भारतात मोठ्या प्रमाणावर आलेल्या पैशाशी संबंधित आहेत. पूंछ जिल्ह्यातील चक्कम-दा-बाग आणि बारामुल्ला जिल्ह्यात उरी भागातील सलामाबाद येथील एलओसी ट्रेड फॅसिलिटेशन सेंटर्सच्या माध्यमातून कॅलिफोर्निया अलमोंडस (बदाम-गिरी) आणि इतर वस्तूंची आयात करण्यात आली त्यातून हा पैसा भारतात आला. या पैशांचा वापर जम्मू आणि काश्मीरमध्ये दहशतवादी आणि फुटीरवादी कारवायांना चिथावणी देण्यासाठी वापरला जात होता, असे हा प्रवक्ता म्हणाला.
संशयितांकडील छाप्यांच्या या कारवाईत दस्तावेज, डिजिटल डिव्हायसेस आणि गुन्ह्याशी संंबंधित इतर साहित्य ताब्यात घेण्यात आले आहे. शस्त्रे, अमली पदार्थ आणि बनावट चलनाची सीमेपलीकडून तस्करी करण्यासाठी काही लोक या व्यापाराचा दुरुपयोग करीत असल्याच्या वृत्तांनंतर भारताने १८ एप्रिल, २०१९ रोजी हा सीमेपलीकडील व्यापार नियंत्रण रेषेवर दोन ठिकाणी बेमुदत बंद केला.
अतिरेकी हल्ल्यातील जखमीचा मृत्यूअतिरेक्यांनी येथील बाटामालू भागात गोळ्या झाडून जखमी केलेले मोहम्मद शफी दार (४५, रा. बाटामालू) यांचा रुग्णालयात उपचार सुरू असताना मृत्यू झाला. अतिरेक्यांनी शनिवारी रात्री ८ च्या सुमारास एस.डी. कॉलनीत दार यांच्यावर गोळ्या झाडल्या होत्या. त्यात ते गंभीर जखमी झाले. अतिरेक्यांनी येथे शनिवारी ठार मारलेले दार हे दुसरे व्यक्ती होत. त्याआधी शनिवारी सायंकाळी अतिरेक्यांनी माजीद अहमद गोजरी (रा. करण नगर) यांची गोळ्या घालून हत्या केली.
अतिरिक्त आयात...अन् त्यातून पैसायाप्रकरणी करण्यात आलेल्या चौकशीतून हे उघड झाले की, काही व्यापारी अतिरिक्त आयात करीत होते आणि त्यातून मिळणारा जास्तीचा नफा दहशतवादी संघटनांकडे वळवत होते तर काही इतर व्यापाऱ्यांचे संबंध बंदी घातलेल्या दहशतवादी संघटनांशी होते असा संशय आहे, असे प्रवक्ता म्हणाला.