श्रीनगर - टेरर फंडिंग प्रकरणात रविवारी सकाळी राष्ट्रीय तपास संस्थेने जम्मू काश्मीरमध्ये चार ठिकाणी छापे मारले. सूत्रांच्या माहितीनुसार एनआयएच्या टीमने उत्तरी काश्मीरमधील बारामुला जिल्ह्यातील चार व्यापारांच्या घरावर धाडी टाकल्या. पोलीस आणि सीआरपीएफच्या मदतीने एनआयएने फुटीरतावादी नेते सज्जान लोनचा सहकारी व्यापारी आसिफ लोन, तनवीर अहमद, तारीक अहमद आणि बिलाल भट यांच्या घरावर धाडी टाकल्या आहेत. त्यांच्या घरातून मिळणाऱ्या कागदपत्रांची तपासणी एनआयएकडून सुरु आहे.
एनआयएच्या अधिकाऱ्यांनी मंगळवारी नियंत्रण रेषेपलीकडे व्यापार करणाऱ्या दोन व्यापाऱ्यांच्या घरावर धाडी मारल्या होत्या. या धाडी पुलवामा आणि श्रीनगर जिल्ह्यात केल्या गेल्या. पोलीस सूत्रांच्या सांगण्यानुसार जम्मू काश्मीर पोलिसांच्या मदतीने एनआयएने पुलवामा जिल्ह्यातील गुलाम अहमद वानीच्या घरावर धाडी टाकल्या. सूत्रांनी सांगितले की, प्रशासन आणि एलओसीवर व्यापार 14 फेब्रुवारी 2019 ला रद्द करण्याआधी वानी त्यात सहभागी होता.
एनआयएच्या सूत्रांनूसार एका अन्य छापेमारी श्रीनगरमधील परिमपोरा येथील फळ बाजारात केली गेली. ही छापेमारी एनआयएकडून टेरर फंडिगच्या चौकशीसाठी केली गेली. एनआयएने आतापर्यंत काश्मीरमधील प्रसिद्ध उद्योगपती जहूर वटाली आणि अनेक फुटिरतावादी नेत्यांना याआधीच अटक केली आहे.
याआधी जम्मू आणि काश्मीरमधील दहशतवादी कारवायांसाठी निधी पुरविल्याप्रकरणी (टेरर फंडिंग) राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) फुटीरतावादी नेता यासिन मलिक याला अटक केली आहे. त्यानंतर त्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले होते. न्यायालयाने त्याची कडक पोलीस सुरक्षा व्यवस्थेत तिहार तुरुंगात रवानगी केली आहे.
यासिन मलिकच्या चौकशीसाठी एनआयएच्या विशेष न्यायालयाने परवानगी दिल्यानंतर त्याला दिल्लीत आणण्यात आले. यासिन मलिकला गेल्या महिन्यात अटक करून त्याची रवानगी जम्मूतील कोट बलवाल तुरुंगात करण्यात आली होती. मात्र, आता यासिन मलिकचा ताबा घेत एनआयएने घेतल्यानंतर त्याला दिल्ली न्यायालयात हजर करण्यात आले. यासीन मलिकच्या चौकशीदरम्यानही अनेक महत्वाचे धागेदोरे एनआयएच्या हाती लागणार आहेत. त्यामुळे एनआयकडून या व्यापाऱ्यांवर टाकलेल्या धाडी या चौकशीमुळेच करण्यात आली असल्याची शक्यता वर्तवली जात आहे.