Attack On NIA Reaction In West Bengal:पश्चिम बंगालच्या भूपतीनगरमध्ये 2022 साली झालेल्या बॉम्बस्फोट प्रकरणाचा तपास करण्यासाठी गेलेल्या राष्ट्रीय तपास संस्थेच्या (NIA) अधिकाऱ्यांवर शनिवारी(दि.6) हल्ला झाला. यामुळे राज्यातील राजकारण चांगलेच तापले आहे. आता याप्रकरणी राष्ट्रीय तपास संस्थेने स्पष्टीकरण दिले आहे. एनआयएने रविवारी (7 एप्रिल) एक निवेदन जारी करून सांगितले की, अधिकाऱ्यांवर झालेल्या हल्ल्यानंतर जे काही आरोप केले जाताहेत, ते निराधार आहेत.
अधिकाऱ्यांविरोधात तक्रारNIA ने शनिवारी पश्चिम बंगालच्या पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यात 2022 च्या बॉम्बस्फोटप्रकरणी मनोब्रता जना आणि बलाई चरण मीती, या दोन प्रमुख आरोपींना अटक केली. त्या स्फोटात तीन जणांचा मृत्यू झाला होता. शनिवारी NIA चे पथक आरोपींना अटक करण्यासाठी गेली असता, त्यांच्यावर हल्ला झाला. या हल्ल्यानंतर पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनी NIA टीमने रात्रीच्या अंधारात महिलांवर हल्ला केल्याचा दावा केला होता. यानंतर बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तृणमूल नेत्याच्या पत्नीच्या तक्रारीच्या आधारे पश्चिम बंगाल पोलिसांनी एनआयए अधिकाऱ्यांविरुद्ध लैंगिक छळ आणि विनयभंगाचा गुन्हा दाखल केला. एनआयएने याबाबत एक निवेदन जारी केले आहे.
एनआयएचे काय म्हणणे आहे?रविवारी आपल्या अधिकृत निवेदनात एनआयएने सर्व आरोप फेटाळून लावले. एनआयएने म्हटले की, बॉम्बस्फोटाशी संबंधित एका जघन्य गुन्ह्याच्या तपास चालू आहे. याप्रकरणी पूर्व मेदिनीपूर जिल्ह्यातील भूपती नगर पोलीस ठाण्याअंतर्गत असलेल्या नरुबिला गावात छापा टाकण्यात आला. आमची कृती प्रामाणिक आणि कायदेशीररित्या अनिवार्य होती. सर्व कायदेशीर प्रक्रिया पार पाडून आरोपींना अटक करण्यात आले. यादरम्यान आम्हाला आमचे कर्तव्य पार पाडण्यापासून रोखण्यासाठी आमच्यावर हल्ला झाला.
एनआयए अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआरNIA टीमवर झालेल्या हल्ल्याच्या एका दिवसानंतर पोलिसांनी NIA अधिकाऱ्यांविरोधातच FIR नोंदवली. एसपी सौम्यदीप भट्टाचार्य म्हणाले की, एनआयएची एक टीम भूपतीनगर पोलिस ठाण्यात पोहोचली असून आम्ही त्यांना पूर्ण सहकार्य केले. बॉम्बस्फोट प्रकरणात अटक करण्यात आलेल्या तृणमूल नेते मनोब्रता जाना यांच्या कुटुंबातील एका महिलेच्या तक्रारीवरून पोलिसांनी एनआयए टीम आणि सीआरपीएफ अधिकाऱ्यांविरुद्ध एफआयआर नोंदवला आहे. एनआयए अधिकाऱ्यांनी रात्री उशिरा घराचे दरवाजे तोडून विनयभंग केल्याचा आरोप आहे.