नवी दिल्ली - राष्ट्रीय तपास संस्था आणि दिल्ली पोलिसांच्या स्पेशल सेलनं संयुक्तरित्या कारवाई राबवत आयएसआयएसचे नवीन मॉड्युल 'हरकत-उल-हर्ब-इस्लाम'चा मोठा कट उधळून लावला आहे. या पार्श्वभूमीवर, नवी दिल्ली आणि उत्तर प्रदेशातील एकूण 16 ठिकाणांवर छापा टाकत पाच संशयितांना अटक करण्यात आली आहे. यादरम्यान, नवी दिल्लीतून चार आणि उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून एका संशयितास ताब्यात घेण्यात आले. याप्रकरणी दिल्लीच्या जाफराबादहून एक ग्रेनेड लॉन्चर, सात पिस्तूल आणि एक तलवार तर, अमरोहा येथून स्फोटकं बनवण्यासाठी लागणारे साहित्य, एक पिस्तूल एवढ्या मोठ्या प्रमाणात शस्त्रसाठा जप्त करण्यात आला आहे. शिवाय, कारवाईदरम्यान ISIS चे एक बॅनरदेखील तपास अधिकाऱ्यांना आढळून आले.
'हरकत-उल-हर्ब-इस्लाम'साठी काम करणारे हे संशयित आरोपी 26 जानेवारीला दिल्ली पोलीस मुख्यालय आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या कार्यालयावर हल्ला करण्याचा कट रचत असल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. या संशयितांनी दोन्ही ठिकाणांची रेकीदेखील केली होती, असेही म्हटलं जात आहे. आजम, अनस, जाहिद आणि जुबेर मलिक अशी नवी दिल्लीतून अटक करण्यात आलेल्यांची नावं आहेत तर या षड़यंत्राचा सूत्रधार हाफिज सुहैल याला उत्तर प्रदेशातील अमरोहा येथून ताब्यात घेण्यात आले. सुहैल हा एका मदरशामध्ये शिक्षक म्हणून कार्यरत होता. NIA, नवी दिल्ली पोलिसांचे विशेष सेल आणि उत्तर प्रदेश एटीएसमधील 150 अधिकाऱ्यांनी संयुक्तरित्या ISISविरोधात ही मोहीम चालवली.