नवी दिल्ली : शेतकरी आंदाेलनामध्ये परकीय सहभागाची चाैकशी करण्यासाठी केंद्र सरकारने पावले उचलली आहेत. राष्ट्रीय तपास संस्थेने (एनआयए) पाच देशांमधून ‘शीख फाॅर जस्टीस’ व इतर खलिस्तानी संघटनांबाबत माहिती मागविली आहे.शेतकरी आंदाेलनादरम्यान २६ जानेवारीला झालेल्या हिंसाचारानंतर केंद्र सरकारने चाैकशी करण्याचा निर्णय घेतला हाेता. खलिस्तानी चळवळीतील दहशतवादी संस्था आंदाेलनाला निधी पुरवत असल्याचे सरकारने यापूर्वीच म्हटले हाेते. त्यानुसार सरकारने अमेरिका, ब्रिटन, कॅनडा, डेन्मार्क आणि स्वीडन या देशांमधून ‘एनआयए’ने माहिती मागविली आहे. परराष्ट्र सचिव अनुराग श्रीवास्तव यांनी यासंदर्भात सांगितले, की कायदेशीर सहकार्य करारांतर्गत अमेरिकेकडे माहिती पुरविण्यासाठी विनंती करण्यात आली आहे. शीख फाॅर जस्टीस जनमत २०२० बाबत ही माहिती अपेक्षित आहे. अशाच प्रकारे बब्बर खालसा इंटरनॅशनल, खलिस्तान टायगर फाेर्स, खलिस्तान झिंदाबाद फाेर्स यासारख्या संघटनांचे मूळ असलेल्या देशांनाही विनंती करण्यात आली आहे. शेतकरी आंदाेलनाच्या नावाखाली पाश्चिमात्य देशांमध्ये माेठ्या प्रमाणावर पैसा गाेळा करण्यात येत आहे. डेन्मार्क आणि स्वीडन येथूनही माहिती गाेळा करण्यात येत आहे. हा पैसा ‘इतर’ कामासाठी वापरण्यात येत असल्याचा ‘एनआयए’ला संशय आहे. याशिवाय दिल्ली पाेलिसांकडूनही काही साेशल मीडिया खात्यांवर नजर आहे. व्यवहार संशयास्पद?सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, वित्त तपास विभागाने सुमारे २० हजार बँक खात्यांचा तपशील गाेळा केला. त्यातील संशयास्पद व्यवहारांची माहिती ‘एनआयए’ला देण्यात आली. त्यानंतर ‘एनआयए’कडून काही नावांची यादी करण्यात आली आहे. या खात्यांमध्ये गेल्या तीन ते चार महिन्यांमध्ये संशयास्पद व्यवहार आढळले आहेत.दोन प्रकरणांची चौकशी‘एनआयए’कडून खलिस्तानी संघटनांच्या जनमत २०२० संदर्भात दाेन प्रकरणांची चाैकशी सुरू आहे. यापैकी एक प्रकरण स्वयंसेवी संस्थांच्या माध्यमातून खलिस्तानी दहशतवादी संघटना भारतात पैसा पुरवीत आहे. हा पैसा भारतात अस्वस्थता निर्माण करण्याचा हेतू आहे.
‘एनआयए’ने ५ देशांतून मागविली खलिस्तानी संघटनांची माहिती, आंदाेलनात परकीय सहभागाची चाैकशी
By ऑनलाइन लोकमत | Published: February 06, 2021 6:16 AM