नवी दिल्ली - रिझर्व्ह बँक ऑफ इंडियाचे गव्हर्नर उर्जित पटेल यांच्या राजीनाम्यानंतर देशातील राजकीय वर्तुळातही खळबळ उडाली आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींनीहीउर्जित पटेल यांची कमी सातत्याने जाणवेल, असे मोदींनी म्हटले आहे. तर, काँग्रेस अध्यक्ष राहुल गांधींनी उर्जित पटेल यांना शाबासकी दिली आहे. बहुत अच्छा मिस्टर पटेल, अखेर मिस्टर 56 इंच छातीवाल्यांपासून बँकांना वाचविण्यासाठी आपण पुढे आलात, कधीच नाही, यापेक्षा उशिर केव्हाही चांगला, असे राहुल यांनी ट्विट केलं आहे.
उर्जित पटेल यांच्या तडकाफडकी राजीनाम्याने देशातील बँकींग क्षेत्रात खळबळ उडाली आहे. गेल्या अनेक दिवसांपासून उर्जित पटेल मोदी सरकारच्या दडपणाखाली काम करत असल्याची चर्चा होती. त्यानंतर, आज त्यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला. बँकेतील सुत्रानुसार, पटेल ऑफिसला आले तेव्हापासूनच शांत होते, दुपार नंतर राजीनामा देत ते निघून गेले. पटेल यांच्या राजीनाम्यानंतर अर्थमंत्री अरुण जेटली यांनी आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत. पटेल यांच्यासोबत काम करणं ही माझ्यासाठी आनंददायक गोष्ट होती. त्यांच्या अभ्यासू वृत्तीचा मला नेहमी फायदा झाला. त्यांच्या पुढील वाटचालीसाठी त्यांना शुभेच्छा." असंही ते पुढे म्हणाले. तर पंतप्रधान नरेंद्र मोदींनी त्याची कमी कायम जाणवेल असे म्हटले आहे.
पंतप्रधान मोदींच्या प्रतिक्रियेनंतर काँग्रेस नेत्यांनीही उर्जित यांच्या राजीनाम्यावर प्रतिक्रिया दिल्या आहेत. भाजपा आणि आरएसएसकडून देशातील संस्थांवर कब्जा करण्यात येत आहे. मात्र, देशाला हे कदापी मान्य नाही, असे ट्विट राहुल गांधींनी केले आहे. तसेच राहुल यांनी उर्जित पटेल आणि सरकार यांच्यातील वादासंदर्भातील एक बातमीही शेअर केली आहे. राहुल यांच्यासह काँग्रेसचे ज्येष्ठ नेते कपिल सिब्बल यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. पंतप्रधानांनीच नेमलेले अधिकारी आपल्या पदाचा राजीनामा देत आहेत. सीईएमधून यापूर्वी अरविंद सुब्रमण्यम बाहेर पडले आहेत. तर, आता उर्जित पटेल यांनीही राजीनामा दिला. त्यामुळे देशाची अर्थव्यवस्था आजारी आहे. मात्र, मोदींना आपण स्वत: मोठे अर्थतज्ञ असल्याचे वाटते, त्यामुळेच त्यांना कुणाची गरज वाटत नाही, असे सिब्बल यांनी म्हटले आहे.
तर तृणमूल काँग्रेसच्या नेत्या आणि पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी यांनीही देशात आर्थिक आणिबाणी लागू झाल्याचे म्हटले आहे. तसेच आयआरबीआयच्या गव्हर्नरने राजीनामा देणे हे देशातील अर्थव्यवस्थेच्या दृष्टीने घातक आहे. त्यामुळे आम्ही राष्ट्रपतींची भेट घेणार असल्याचेही बॅनर्जी यांनी म्हटले आहे.
दरम्यान, मी वैयक्तिक कारणामुळे राजीनामा देत असल्याचं त्यांनी म्हटलं आहे. भारतीय रिझर्व्ह बॅंकेचे गव्हर्नरपद भूषवणं तसेच RBIच्या इतर पदांवर काम करणं ही माझ्यासाठी अभिमानाची बाब होती असं त्यांनी म्हटलं आहे.