एलरू - आंध्र प्रदेशातील एलरूमध्ये एक रहस्यमय आजार पसरल्याने लोकांमध्ये दहशत पसरली आहे. रविवारी रात्री या रहस्यमय आजारानेबाधित असलेल्या रुग्णांच्या संख्येत वाढ झालेली पाहायला मिळाली. त्यानंतर भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. रुग्णालयात अनेक रुग्णांवर अजूनही उपचार सुरू आहेत. उपचारादरम्यान एका व्यक्तीचा मृत्यू झाला. अचानक फीट येणं, बेशुद्ध पडणं, अंग थरथर कापायला लागणं आणि तोंडातून फेस येणं अशी लक्षणं रुग्णांमध्ये दिसत आहेत. या नवीन आजाराने डॉक्टरही चक्रावले होते. मात्र आता या रहस्यमय आजारामागचं गूढ उकललं आहे.
आजारामागचं धक्कादायक सत्य समोर आलं आहे. आंध्र प्रदेशच्या एलुरू शहरात पेयजल आणि दुधात असलेल्या निकेल (nickel) आणि शिशासारखे (lead) जड तत्व हे या रहस्यमय आजाराचं कारण आहे. या आजारामुळे आतापर्यंत 500 हून अधिक लोक आजारी पडले आहेत. अखिल भारतीय आयुर्विज्ञान संस्था (एम्स) आणि राज्य, तसेच इतर केंद्रीय संस्थांच्या विशेष पथकांद्वारे शोधून काढण्यात आलेल्या कारणांच्या आधारे वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मंगळवारी मुख्यमंत्री वाय. एस. जगनमोहन रेड्डी यांना आपला रिपोर्ट सादर केला आहे.
रहस्यमय आजाराचे कारण निकेल आणि शीसे असल्याचं स्पष्ट झालं असल्याचं मुख्यमंत्री कार्यालयाद्वारे जारी करण्यात आलेल्या एका जाहिरातीत एम्सच्या विशेषज्ञांनी तयार केलेल्या रिपोर्टच्या आधारे म्हटलं आहे. या आजारामुळे अचाननक लोक बेशुद्ध झाले, भीती वाटणे,उलटी होणे आणि पाठदुखी असे त्रास लोकांना जाणवू लागले. रुग्णांच्या शरीरात जड धातुतत्वांच्या अस्तित्वाबाबत तपास करावा आणि उपचार प्रक्रियेवर सतत लक्ष ठेवावे असं मुख्यमंत्र्यांनी अधिकाऱ्यांना निर्देश दिले असल्याची माहिती मिळत आहे.
अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार, या आजाराने आतापर्यंत 505 लोकांना त्रास जाणवला आहे. त्यापैकी 370 लोक बरे झाले आहेत, तर इतर 120 जणांवर उपचार सुरू आहेत. जागतिक आरोग्य संघटनेद्वारे नियुक्त करण्यात आलेल्या विशेषज्ञांव्यतिरिक्त केंद्रीय आरोग्य मंत्रालयाद्वारे गठीत करण्यात आलेले तीन सदस्यीय पथक मंगळवारी एलुरूला पोहोचले. या पथकाने नमुने गोळा करण्यासाठी प्रभावित भागांचा दौरा केला. या आजाराने आजारी झालेले लोक बरे होत असून घाबरण्याची काहीही आवश्यकता नसल्याचे उपमुख्यमंत्री ए. के. के श्रीनिवास यांनी म्हटलं आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे.