कंझावला केसमध्ये एकापाठोपाठ एक गौप्यस्फोट होत आहेत. या अपघातात मृत्युमुखी पडलेल्या अंजलीचा बॉयफ्रेंड समोर आला असून, त्याने ही घटना घडली त्या रात्री नेमकं काय घडलं, याबाबत धक्कादायक गौप्यस्फोट केले आहेत. हा तरुणही ३१ डिसेंबरच्या रात्री हॉटेलमध्ये अंजली आणि इतर मित्रांसोबत हॉटेलमध्ये होता. या तरुणाने सांगितले की, अंजलीने त्या दिवशी मला फोन करून हॉटेलमध्ये बोलावले होते. मी तिच्याशी बोलत नव्हतो. त्यामुळे तिने एका मुलाला पाठवून मला बोलावून घेतले होते.
अंजलीच्या बॉयफ्रेंडने सांगितले की, तिथे दोन रूम बुक करण्यात आले होते. त्यामधील एकामध्ये त्यांचे काही मित्र होते. तर एका रुममध्ये अंजली आणि निधी उपस्थित होती. त्याने सांगितले की, ते सर्वजण मद्यपान करत होते. त्यानंतर अंजली आणि निधीमध्ये भांडण सुरू झालं. दोघांमध्येही हे भांडण पैशांवरून झालं. त्यावेळी निधी अंजलीकडे तिचे पैसे मागत होती. त्यादरम्यान त्या दोघींमध्ये बरीच वादावादी झाली. त्यानंतर रात्री दीडच्या सुमारास अंजली तिथून निघून गेली. मी नंतर तिथून गेलो. मला अंजलीच्या मृत्यूची बातमी सोशल मीडियावरून कळली.
या प्रकरणी आधी समोर आलेल्या माहितीनुसार हॉटेलमधील रुम ही अंजलीने नाही तर निधीने बुक केली होती. हॉटेलमधील खोली क्र. १०४ बुक करणारी निधी होती. तसेच हॉटेलमधील खोलीची बुकिंग ही ८०० रुपयांना करण्यात आली होती. दिल्ली पोलिसांना हॉटेल विवान पॅलेसच्या रजिस्टरमधून ही माहिती मिळाली आहे.
या प्रकरणात आतापर्यंत सात आरोपींना अटक करण्यात आली आहे. या प्रकऱणातील सातवा आरोपी अंकुश खन्ना याने शुक्रवारी आत्मसमर्पण केले. दिल्लीतीय एका कोर्टाने कंझावला केसमधील सहा आरोपींना तीन दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे.