नवी दिल्ली, दि. 01 - नीती आयोगाचे उपाध्यक्ष अरविंद पनगढिया यांनी आपल्या पदाचा राजीनामा दिला आहे. अरविंद पनगढिया पुन्हा शिक्षण क्षेत्रात काम करणार असल्याची माहिती मिळते. मिळालेल्या माहितीनुसार, ख्यातनाम अर्थतज्ज्ञ अरविंद पनगढिया 31 ऑगस्ट रोजी नीती आयोगाचे उपाध्यक्षपद सोडणार आहेत. त्यांनी 1 सप्टेंबरपर्यंत पद सोडण्याची नोटीस सरकारला दिली आहे. अरविंद पनगढिया पुन्हा शिक्षण क्षेत्रात परत येणार आहेत. नियोजन आयोग गुंडाळून त्या जागी पंतप्रधानांच्या अध्यक्षतेखाली स्थापन झालेल्या ‘राष्ट्रीय भारत परिवर्तन संस्था’ (नॅशनल इन्स्टिट्यूट फॉर ट्रान्सफॉर्मिंग इंडिया-एनआयटीआय) अर्थात नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी अरविंद पनगढिया यांची 2015 मध्ये नेमणूक करण्यात आली होती. 65 वर्षांचे अरविंद पनगढिया अमेरिकेच्या कोलंबिया विद्यापीठात प्रोफेसर होते. तसेच, आशियाई विकास बँकेचे मुख्य अर्थतज्ज्ञ आणि कॉलेज पार्क मेरीलँडच्या आंतरराष्ट्रीय अर्थशास्त्र केंद्रात अर्थशास्त्राचे प्रोफेसर व सहसंचालकपद त्यांनी भूषविले आहे. याचबरोबर प्रिन्सटन विद्यापीठातून अर्थशास्त्रात डॉक्टरेट मिळविणाऱ्या अरविंद पनगढिया यांनी जागतिक बँक, आंतरराष्ट्रीय नाणे निधी, जागतिक व्यापार संघटना आणि व्यापार व विकासावरील संयुक्त राष्ट्र संमेलनात विविध पदांवर काम केले आहे.
#NitiAayog Vice-Chairman #ArvindPanagariya resigns; says he will return to academia, August 31 to be last day in office.
— Press Trust of India (@PTI_News) August 1, 2017