सिल्क्यरा बोगदा दुर्घटनेवर NIDM सखोल अभ्यास करणार; कार्यकारी संचालकांनी दिली माहिती
By ऑनलाइन लोकमत | Published: November 29, 2023 08:09 AM2023-11-29T08:09:51+5:302023-11-29T08:14:10+5:30
सदर घटनेवरील अभ्यास हिमालयीन प्रदेशात रस्ते आणि बोगदे बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल.
उत्तराखंडमधील सिलक्यारा बोगद्यामध्ये गेल्या १७ दिवसांपासून अडकलेल्या ४१ मजुरांना मंगळवारी सायंकाळी सुखरूपपणे बाहेर काढण्यात आले. वेगवेगळे प्रयत्न करूनही गेले १७ दिवस या मजुरांना ढिगाऱ्याच्या आतच अडकून रहावे लागले होते. अखेर ऑगर मशीनने अर्धवट सोडलेले खोदाईचे काम रॅट मायनिंगच्या कामगारांनी पूर्ण केले आणि या सर्वांची सुटका झाली. ही दुर्घटना देशासाठी एक केस स्टडी बनेल, असं नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ डिझास्टर मॅनेजमेंट (NIDM) चे कार्यकारी संचालक राजेंद्र रतनू यांनी सांगितले.
राजेंद्र रतनू म्हणाले की, सिल्क्यरा बोगदा दुर्घटना संपूर्ण देशासाठी एक केस स्टडी बनेल. भविष्यात बोगदा बांधताना आपण कोणती खबरदारी घेतली पाहिजे आणि उणिवा कशा दूर कराव्यात याचा NIDM संपूर्ण सखोल अभ्यास करणार आहे. देशात कोठेही बोगदे बांधले जातील, त्या बांधकामाशी संबंधित संस्था आणि विभागांशी आधीच तयार केलेल्या मॉड्यूलवर चर्चा करून पुढे जाण्याचा आमचा प्रयत्न असेल, असं राजेंद्र रतनू यांनी सांगितले.
सदर घटनेवरील अभ्यास हिमालयीन प्रदेशात रस्ते आणि बोगदे बांधण्यासाठी महत्त्वपूर्ण ठरेल. हिमालयातील सर्व राज्यांचा संपूर्ण भूगोल इतर राज्यांपेक्षा वेगळा आहे. त्यामुळे उत्तराखंडमध्ये अशी राष्ट्रीय संस्था सुरू करावी, ज्यामध्ये आपत्ती व्यवस्थापनाशी संबंधित संशोधन, प्रशिक्षण आणि इतर महत्त्वाचे काम करता येईल, अशी सूचना हिमालयीन राज्यांकडून आली होती. हा प्रस्ताव केंद्र सरकारकडे सन २०२२ पासून प्रलंबित आहे. आज मुख्यमंत्र्यांनी हा प्रस्ताव पुढे नेणार असल्याचे सांगितले आहे, अशी माहिती देखील राजेंद्र रतनू यांनी यावेळी दिली.
ऑपरेशनचा हिरो.. अरनॉल्ड डिक्स
ऑस्ट्रेलियाचे मायक्रोटनलिंग तज्ज्ञ अरनॉल्ड डिक्स यांना भारत सरकारने सल्लागार म्हणून बचाव कार्यात सामील होण्यासाठी आमंत्रित केले होते. त्यानंतर त्यांनी अनेक दिवस आणि रात्र बोगद्याच्या बाहेर बचाव कर्मचाऱ्यांसोबत घालवली. सिलक्यारा बोगद्यातील बचाव ऑपरेशन आतापर्यंतचे ‘सर्वात कठीण’ ऑपरेशन आहे. केवळ तांत्रिक कारणांसाठी हे सर्वात कठीण (ऑपरेशन) आहे, असे नाही तर यात मोठा धोका आहे. आतील प्रत्येकजण सुरक्षितपणे बाहेर पडेल, याची खात्री करण्यासाठी हे ऑपरेशन आहे.
१२ रॅट-माइनर्स आत गेले अन् डोंगर पराभूत झाला
शक्तिशाली ऑगर ड्रिलिंग मशीन शुक्रवारी ढिगाऱ्यात अडकल्याने अधिकाऱ्यांनी शेवटच्या १० मीटरचा ढिगारा खोदण्यासाठी हाताने बोरिंग करण्याची योजना आखली होती. मर्यादित जागेत हाताने पकडलेल्या साधनांचा वापर करून ड्रिलिंगचा शेवटचा भाग पूर्ण करण्यासाठी १२ रॅट-माइनर्स बोलावण्यात आले होते. त्यांनी चोख कामगिरी बजावली. त्यांचे कौशल्य आणि अनुभव कामी आला, त्यांनी २४ तासांपेक्षा कमी वेळेत १० मीटर खोदून एक अभूतपूर्व काम केले. रॅट-होल खाणकाम बेकायदेशीर असू शकते; परंतु या तज्ज्ञांची प्रतिभा आणि अनुभव यांचा योग्य वापर येथे केला गेला, असे हसनैन यांनी सांगितले. ते दिल्ली, झाशी आणि देशाच्या इतर भागातून आले होते.