जयललितांच्या अब्जावधींच्या संपत्तीचा वारस कोण? मद्रास हायकोर्टाने दिला निकाल
By ऑनलाइन लोकमत | Published: May 28, 2020 01:24 PM2020-05-28T13:24:26+5:302020-05-28T13:25:37+5:30
तामिळनाडूच्या माजी मु्ख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपत्तीवरून वाद सुरू झाला होता.
चेन्नई - तामिळनाडूच्या माजी मुख्यमंत्री जयललिता यांच्या संपत्तीवरून सुरू असलेल्या न्यायालीन लढाईचा अखेर आज निकाल लागला आहे. मद्रास हायकोर्टात याप्रकरणी झालेल्या सुनावणीनंतर न्यायालयाने जयललिता यांच्या अब्जावधीच्या मालमत्तेच्या वासरदारांची घोषणा केली आहे. हायकोर्टाने जयललिता यांची भाची दीपा जयकुमार आणि भाचा दीपक जयकुमार यांना त्यांच्या मालमत्तेचे कायदेशीर वारस घोषित केले आहे. त्यामुळे हे दोघेती आता जयललितांच्या मालमत्तेचे वारसदार असतील.
तामिळनाडूच्या माजी मु्ख्यमंत्री जयललिता यांचे ५ डिसेंबर २०१६ रोजी निधन झाले होते. त्यानंतर त्यांच्या संपत्तीवरून वाद सुरू झाला होता. जयललिता ह्या जन्मभर अविवाहित राहिल्या, त्यामुळे त्यांचे अपत्य नव्हते. जयललितांच्या मृत्यूनंतर काही आठवड्यांनी त्यांच्या निकटवर्तीय असलेल्या शशिकला यांना अण्णा द्रमुकच्या महासचिवपदी नियुक्त करण्यात आले होते. दरम्यान, शशिकला यांना एका प्रकरणात दोषी ठरवण्यात आले होते.
दरम्यान, जयललितांच्या संपत्तीबाबत आज झालेल्या सुनावणीवेळी न्यायमूर्ती किरुबाकरण आणि न्यायमूर्ती अब्दुल कुद्दूस यांच्या खंडपीठाने स्पष्ट केले की, दीपक आणि दीपा आपल्या सदसदविवेकबुद्धीनुसार काही संपत्ती एकत्रित करतील आणि न्यायालयाच्या निर्णयाची प्रत मिळाल्याच्या तारखेपासून आठ आठवड्यांपूर्वी सामाजिक सेवा करण्याच्या उद्देशाने आपल्या दिवंगत आत्याच्या नावे एक नोंदणीकृत सार्वजनिक ट्रस्ट स्थापन करतील.
आज निकाल सुनावताना न्यायालयाने अण्णा द्रमुकचे कार्यकर्ते के. पुगलेंथी यांनी दाखल केलेली एक अन्य याचिकाही फेटाळून लावली आहे. या याचिकेत त्यांनी जयललिता यांच्या संपत्तीवर प्रशासक म्हणून स्वत:ची नियुक्ती करण्याची मागणी केली होती. न्यायालयाने जयललिता यांचे वारस घोषित केलेले दीपक आणि दीपा हे जयललितांचे बंधू जयकुमार यांची मुले आहेत.