ग्रेटर नॉयडा : नायजेरियाच्या चार विद्यार्थ्यांवर हल्ला केल्याच्या आरोपावरून पाच जणांना ग्रेटर नॉयडा पोलिसांनी उत्तर प्रदेशात अटक केली. स्थानिकांनी नायजेरियन लोकांना इतके बेदम मारले की त्यांना रुग्णालयामध्ये दाखल करण्यात आले आहे. त्यांना मारहाण होत असताना, ते वाचवा, वाचवा असे जोरजोरात ओरडत होते, पण त्यांना वाचवायला कोणीही पुढे आले नाही. नायजेरियन नागरिकाच्या कारचीही जमावाने नासधूस केली.परराष्ट्रमंत्री सुषमा स्वराज यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली आहे. या नारजेरियन विद्यार्थ्यांनी त्यांच्या दुतावासाला आणि सुषमा स्वराज यांना सोशल मीडियावरून मारहाणीची माहिती दिली. बारावीत शिकणाऱ्या मनीषला (१७) काही विदेशी लोकांनी पळवून नेऊन त्याला अमली पदार्थ दिले व त्यामुळेच त्याचा मृत्यू झाला असा आरोप या मुलाच्या पालकांनी केला. गेल्या आठवड्यात मनीषचा मृत्यू झाल्यानंतर येथील रहिवाशांनी येथे मेणबत्ती मोर्चा काढला होता व त्यानंतर चार नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला झाला. मनीषच्या मृत्यू प्रकरणी पोलिसांनी ताब्यात घेतलेल्या काही नायजेरियनांना पुरावा नसल्यामुळे सोडून देण्यात आल्यानंतर रहिवाशांनी निषेध मोर्चा काढला होता. ग्रेटर नॉयडाच्या पोलिस अधीक्षक सुजाता सिंह म्हणाल्या की, मोर्चाच्या दरम्यान मोर्चेकरू हिंसक बनले व त्यांनी रस्त्यात जो कोणता अफ्रिकन दिसेल त्याला मारहाण सुरू केली. जमाव अन्साल मॉलमध्येही गेला व तेथे त्याने अफ्रिकन्सना मारहाण सुरू करून दहशत निर्माण केली. पोलिसांनी अफ्रिकनांची सुटका करून त्यांना सुरक्षित स्थळी नेले, असे सुजाता सिंह म्हणाल्या. मनीषच्या पालकांनी आरोप केलेल्या नायजेरियन नागरिकांना पोलिसांनी क्लिन चिट दिलेली नाही, अशी माहिती ग्रेटर नॉयडाच्या पोलिस अधीक्षकांनी म्हटले. हल्लेखोर जमावाला आवरण्यासाठी पोलिसांना बळाचा वापर करावा लागला. पाच जणांना घटनास्थळीच अटक करण्यात आली. त्या ठिकाणी खोडसाळपणा करणाऱ्या अनेकांची ओळख पटली असून संपूर्ण घटनेचे व्हिडिओ चित्रीकरण झाले आहे. गुन्हा दाखल झाला असून त्यानुसार कारवाई केली जात आहे, अशी माहिती सह पोलिस महासंचालक (कायदा आणि सुव्यवस्था) दलजित चौधरी यांनी वार्ताहरांशी बोलताना दिली. (वृत्तसंस्था)मुख्यमंत्र्यांशी बोलले : स्वराजनवी दिल्ली : आफ्रिकन विद्यार्थ्यांवर झालेल्या हल्ल्यासंदर्भात परराष्ट्र मंत्री सुषमा स्वराज या उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांच्याशी बोलल्या. तत्पूर्वी, विदेशी विद्यार्थ्यांनी या प्रकरणी तातडीने कारवाई करावी, असे आवाहन स्वराज यांना केले होते. हल्ला झाला त्या भागात राहणे जीविताला धोका निर्माण करणारे असल्याचे विदेशी नागरिकांचे म्हणणे होते. केंद्र सरकार तातडीने पावले उचलत असून उत्तर प्रदेश सरकारनेही मारहाणीच्या या दुर्दैवी घटनेची तटस्थपणे व योग्य चौकशी करण्याचे आश्वासन दिल्याचे सुषमा स्वराज टिष्ट्वटरवर म्हणाल्या.
नायजेरियन विद्यार्थ्यांवर हल्ला, ५ जणांना अटक
By admin | Published: March 29, 2017 1:47 AM