ऑनलाइन लोकमत
नवी दिल्ली, दि. 25 - पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी आज देशवासियांशी केलेल्या 33व्या मन की बात कार्यक्रमात आणीबाणीच्या कटू आठवणींना उजाळा दिला. प्रकाश त्रिपाठी यांनी लिहिलेल्या पत्राचा हवाला देत मोदी म्हणाले, ज्या व्यक्ती भारतीय लोकशाहीवर प्रेम करतात. ते आणीबाणीची ती काळी रात्र विसरू शकणार नाहीत. 25 जून 1975 च्या त्या रात्री संपूर्ण देश तुरुंगात बदलून गेला होता. विरोधकांचा आवाज दाबला जात होता.
आणीबाणीच्या कटू आठवणी जनतेच्या मनात कायम राहाव्यात यासाठी भाजपाकडून प्रयत्न सुरू असतानाच आज मोदींनीही आणीबाणीच्या आठवणींना उजाळा दिला. प्रकाश त्रिपाठी लिहिलेल्या पत्राचा उल्लेख मोदींनी केला. मोदी म्हणाले, लोकशाहीसाठी नित्य जागरुकता आवश्यक आहे, असे प्रकाशजी लिहितात. ज्या व्यक्ती भारतीय लोकशाहीवर प्रेम करतात. ते आणीबाणीची ती काळी रात्र विसरू शकणार नाहीत." यावेळी माजी पंतप्रधान अटल बिहारी वाजपेयी यांची कविता वाचून दाखवत मोदींनी तेव्हाच्या परिस्थितीचे वर्णन केले.
अमेरिका दौऱ्यावर गेलेल्या मोदींनी आज मन की बातच्या माध्यमातून देशवासियांशी संवाद साधला. यावेळी मोदींनी उत्तर प्रदेशमधील मुबारकपूरमधील ग्रामस्थांचा उल्लेख केला, येथील ग्रामस्थांनी स्वखर्चाने शौचालय बांधत सरकारचे 17 लाख रुपये परत केले होते. तसेच आंध्र प्रदेशमधील विजयनगरम जिल्ह्यात 100 तासांत 10 हजार घरगुती शौचालये बांधणाऱ्या विजयनगरम प्रशासन आणि ग्रामस्थांचेही मोदींनी कौतुक केले.
योग दिनाला जगभरात मिळालेल्या उत्स्फूर्त प्रतिसादाबाबत बोलताना मोदींनी योगच्या माध्यमातून जगाला जोडण्याचे काम झाल्याचे सांगितले. आपल्यालाही लखनौमध्ये भर पावसाच योग करण्याची संधी मिळाल्याचे सांगत मोदींनी योगमुळे लोग फिटनेसकडून वेलनेसकडे जात असल्याचे सांगितले.
सरकारला कुठलीही वस्तू विकू इच्छिणाऱ्यांनी ई जेमवर रजिस्टर करावे, गव्हर्मेंट ई मार्केट प्लेस ई जेमच्या माध्यमातून तुम्ही पारदर्शकता आणू शकाल, असे आवाहन मोदींनी केले.तसेच अंतराळ क्षेत्रात सातत्याने यशस्वी कामगिरी करत असलेले इस्रोचे शास्रज्ञ आणि बॅडमिंटनमध्ये चमकदार कामगिरी करणाऱ्या किदम्बी श्रीकांतचेही मोदींनी अभिनंदन केले.