शिमला - हिमाचल प्रदेशच्या शिमला जिल्ह्यातील रामपूर येथे सर्वधर्म समभावतेचं आदर्शव्रत उदाहरण पाहायला मिळालं आहे. रामपूरच्या सत्यनारायण मंदिर परिसरात एका मुस्लीम जोडप्याने लग्नसोहळा पूर्ण केला. विश्व हिंदू परिषदेच्या ठाकूर सत्य नारायण मंदिर परिसरातील बँक्वेट हॉलमध्ये हा विवाहसोहळा पार पडला. लग्न आणि इतर धार्मिक, सामाजिक कार्यक्रमांसाठी येथील बँक्वेट हॉल नेहमीच बुक करण्यात येतो. या हॉलमध्ये एका मुस्लीम जोडप्याचे लग्न लागल्याने आश्चर्य आणि कौतुकही होत आहे.
मंदिर परिसरात मौलवी यांनी मुस्लीम परंपरेनुसार निकाह पठण केल्यानंतर शादी कबुल झाली. यावेळी, गवाह म्हणजेच साक्षीदार म्हणून वकीलही हजर होते. हिंदू मंदिर परिसरात झालेल्या या लग्नसोहळ्याचा मुख्य उद्देश हा लोकांमध्ये बंधुप्रेम वाढावे आणि धार्मिक सामंजस्य अबाधित राहावे हाच होता. विशेष म्हणजे हे सत्य नारायण मंदिर विश्व हिंदू परिषद आणि राष्ट्रीय स्वयंसेवक संघाचे जिल्हा मुख्य कार्यालय आहे.
ठाकूर सत्य नारायण मंदिर ट्रस्टचे महासचिव विनय शर्मा यांनी सांगितले की, विश्व हिंदू परिषद या मंदिराची देखरेख करते. तसेच, येथूनच राष्ट्रीय स्वयंसेवक संघाच्या जिल्हा कार्यालयाचे कामकाजही पाहिले जाते. संघ परिवार आणि विश्व हिंदू परिषदेला मुस्लीमविरोधी म्हटले जाते, मात्र आज मुस्लीम जोडप्याने येथे लग्न करुन हे दाखवून दिलंय की, सनातन धर्म प्रेरणा देतो, तसेच सर्वांना सोबत घेऊन पुढे जाण्याची शिकवण देतो, असेही शर्मा यांनी म्हटले.
मुलीचे वडिल महेंद्रसिंह मलिक यांनी म्हटले की, येथील ट्रस्ट आणि व्हीएचपीचे या लग्नासाठी मोठे योगदान राहिले आहे. त्यामुळे, रामपूरच्या लोकांमध्ये बंधुप्रेम असल्याचं उदाहरण समोर ठेवलंय. हिंदू-मुस्लीम या दोन्ही समाजातील बंधुप्रेम आम्ही असंच वाढवू, असेही मलिक यांनी म्हटले.