नवी दिल्ली - सीमारेषेवर पाकिस्तानच्या कुरापती दिवसेंदिवस वाढत आहेत. याच दरम्यान जम्मू काश्मीरच्या उरी सेक्टरमध्ये दहशतवादी आणि सुरक्षा दलामध्ये झालेल्या चकमकीदरम्यान एक जवान शहीद झाला आहे. दहशतवाद्यांकडून होत असलेल्या गोळीबाराला प्रत्युत्तर देताना एका 19 वर्षीय जवानाला वीरमरण आलं आहे. निखिल दायमा असं शहीद झालेल्या जवानाचं नाव असून ते राजस्थानच्या अलवार जिल्ह्यातील सैदपूर गावचे रहिवासी होते.
मिळालेल्या माहितीनुसार, निखिल दायमा हे भारतीय सैन्याच्या राजपूत रेजिमेंटचे जवान होते. दोन दिवसांपूर्वी ते बेस कँपहून उरी येथे गेले होते. 19 वर्षीय निखिल यांची उरी येथे पहिली पोस्टिंग होती. मात्र दहशतवाद्यांशी झालेल्या चकमकीदरम्यान निखिल यांना गोळी लागली होती. त्यानंतर त्यांना उपचारासाठी तातडीने रुग्णालयात नेण्यात आलं होतं. मात्र त्यांना वीरमरण आलं. कुटुंबियांनी दिलेल्या माहितीनुसार, 13 जानेवारीला सुट्टीवरून ते पुन्हा ड्युटीवर दाखल झाले होते.
2019 मध्ये ते भारतीय सैन्यदलात रुजू झाले होते. ट्रेनिंगनंतर त्यांचं उरीमध्ये पोस्टिंग झालं होतं. निखिल शहीद झाल्याची माहिती मिळाल्यावर कुटुंबियांसह संपूर्ण गावावर शोककळा पसरली आहे. निखिल यांचं पार्थिव जम्मू-काश्मीरहून दिल्लीला रवाना होणार असून त्यानंतर त्यांच्या मूळ गावी सैदपूर येथे नेण्यात येणार असल्याची माहिती मिळत आहे. राजस्थानचे मुख्यमंत्री अशोक गेहलोत यांनी आपल्या ट्विटर अकाऊंटवरून निखिल दायमा यांना श्रद्धांजली वाहली आहे. एका हिंदी वेबसाईटने याबाबतचे वृत्त दिले आहे
कुलगाममध्ये दहशतवाद्यांचा ग्रेनेड हल्ला, चार जवान जखमी
जम्मू-काश्मीरच्या कुलगाममध्ये काही दिवसांपूर्वी दहशतवाद्यांनी सैन्याच्या एका टीमवर ग्रेनेड हल्ला केला होता. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले होते. जखमी जवानांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आलं असून त्यांच्यावर उपचार सुरू होते. कुलगाम जिल्ह्यातील खानबलच्या शमशीपोरा बुधवारी सकाळी दहाच्या सुमारास सॅनिटेशन ड्रिलदरम्यान दहशतवाद्यांनी भारतीय सैन्याच्या रोड ओपनिंग पार्टीवर ग्रेनेड हल्ला केला. या हल्ल्यात चार जवान जखमी झाले होते. ग्रेनेड हल्ल्यानंतर दहशतवाद्यांना पकडण्यासाठी शोधमोहीम सुरू केली आहे.