इरोड - कन्नड चित्रपटसृष्टीतील सुपरस्टार राजकुमार यांचे ३० जुलै २००० रोजी अपहरण करणाऱ्या १४ पैकी ९ आरोपींची सत्र न्यायालयाने पुराव्याअभावी निर्दोष मुक्तता केली आहे. चंदनतस्कर वीरप्पन व त्याच्या १४ साथीदारांनी १८ वर्षांपूर्वी राजकुमार यांचे अपहरण केल्याने खळबळ उडाली होती.अतिरिक्त सत्र न्यायाधीश गोबीचेट्टीपलायम यांनी निकाल देताना म्हटले आहे की, या नऊ जणांवरील आरोप सिद्ध होण्यासाठी ठोस पुरावे सरकारी पक्षाला न्यायालयात सादर करता आले नाहीत. या खटल्यात ४७ जणांनी साक्षी दिल्या होत्या; पण त्यातूनही फारसे काही निष्पन्न झाले नाही.तामिळनाडूतील दोड्डा गजनूर या गावात असलेल्या फार्महाऊसमधून राजकुमार यांचे अपहरण करण्यात आले होते. तलवडी येथील जंगलक्षेत्रात ते १०० पेक्षा जास्त दिवस वीरप्पनच्या ताब्यात होते. या काळात तामिळनाडू व कर्नाटक या राज्यांचे संबंध विलक्षण तणावाचे बनले होते. अखेर १०८ व्या दिवशी राजकुमार यांची अपहरणकर्त्यांनी मुक्तता केली. वीरप्पनच्या नऊ साथीदारांना पोलिसांनी अटक केली होती.या आरोपींना नंतर जामीनही मिळाला होता. न्यायाधीशांनी निकालपत्राचे वाचन केले त्यावेळी पुत्तुसामी हा आरोपी वगळता अन्य सर्व आरोपी न्यायालयात उपस्थित होते. पुत्तुसामी याची प्रकृती बिघडल्याने तो हजर राहू शकला नाही. महत्त्वाच्या खटल्याचा निकाल असल्याने न्यायालयाच्या परिसरात मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. (वृत्तसंस्था)वीरप्पनची दहशतया प्रकरणी राजकुमार यांच्या पत्नीने वीरप्पन व त्याच्या साथीदारांच्या विरोधात पोलिसांत तक्रार दाखल केली होती.२००४ साली धर्मपुरी येथे सुरक्षा दलाबरोबर झालेल्या चकमकीत वीरप्पन व त्याचे तीन साथीदार मारले गेले होते. चंदन व हस्तीदंताची तस्करी हा वीरप्पनचा उद्योग होता.सत्यमंगलमच्या जंगलातील चंदनाची हजारो झाडे त्याने तोडली आणि हत्तींनाही ठार केले होते. त्याला पकडण्यासाठी तामिळनाडू व कर्नाटक पोलिसांनी अनेक मोहिमा राबविल्या होेत्या.
सुपरस्टार राजकुमार अपहरणातील नऊ आरोपी निर्दोष
By ऑनलाइन लोकमत | Published: September 26, 2018 5:22 AM