नवी दिल्ली : पुलवामा जिल्ह्यातील लेथपुरा गावात डिसेंबर २०१७ मध्ये केंद्रीय राखीव पोलीस दलाच्या (सीआरपीएफ) तळावर झालेल्या अतिरेकी हल्ल्यातील पाचव्या आरोपीला राष्ट्रीय तपास यंत्रणेने (एनआयए) रविवारी गजाआड केले. एनआयए प्रवक्त्याने सांगितले की, इरशाद अहमद रेशी याला दक्षिण काश्मीरच्या पुलवामामधून अटक करण्यात आली. निसार अहमद तांत्रे आणि सय्यद हिलाल अंद्राबी या आधी अटक करण्यात आलेल्या दोन संशयितांची चौकशी केल्यानंतर इरशाद अहमद रेशी याला गजाआड करण्यात आले. एनआयएने त्या दोघांना यापूर्वीच अटक केलेली आहे.रेशी हा जैश-ए-मोहम्मद या अतिरेकी संघटनेशी संबंधित होता व ठार करण्यात आलेला अतिरेकी नूर मोहम्मद तांत्रे ऊर्फ नूर त्राली याचा निकटवर्तीय होता. काश्मीर खोऱ्यात अतिरेकी संघटनेच्या कारवाया वाढवण्यात त्राली याचा मोठा हात होता. डिसेंबर २०१७ मध्ये सुरक्षा दलांशी झालेल्या चकमकीत त्याला यमसदनी पाठवण्यात आले होते.त्राली याच्या मृत्यूचा बदला घेण्यासाठी लेथपुरामध्ये सीआरपीएफच्या तळावर हल्ल्याचा कट रचण्यात आला. सीआरपीएफच्या तळावर ३० व ३१ डिसेंबर २०१७ च्या दरम्यान रात्री जैशच्या तीन अतिरेक्यांनी हल्ला केला होता. त्यातील अतिरेक्यांची ओळख पटली असून, त्यांची नावे फरदीन अहमद खांडे, मंजूर बाबा आणि पाकिस्तानी नागरिक अब्दुल शकूर अशी असल्याचे समोर आले आहे. या अतिरेकी हल्ल्यात पाच जवान शहीद झाले होते व चकमकीत तीन अतिरेक्यांचा खात्मा करण्यात आला होता. (वृत्तसंस्था)>पोलीस कोठडी मागणारलेथपुरा हल्ला प्रकरणात फयाद अहमद मांगरे व मंजूर अहमद भट यालाही गजाआड करण्यात आलेले आहे. पुलवामामध्ये रविवारी पकडण्यात आलेला संशयित इरशाद अहमद रेशी याला सोमवारी जम्मूच्या विशेष एनआयए न्यायालयात हजर केले जाणार आहे. पुढील चौकशीसाठी त्याची पोलीस कोठडी मागण्यात येणार आहे.
2017च्या हल्ल्यातील पाचव्या आरोपीला एनआयएकडून अटक
By ऑनलाइन लोकमत | Published: April 15, 2019 4:13 AM