- शीलेश शर्मा, नवी दिल्लीपरिस्थितीमुळे विवश झालेले महाराष्ट्रातील नऊ शेतकरी दररोज आत्महत्या करीत आहेत. मोदी सरकार शेतकऱ्यांबद्दल पूर्णपणे असंवेदनशील बनले आहे. देशातील परिस्थिती काय आहे. सरकारने कृषी संकटावर मात करण्यासाठी कोणती पावले उचलली आहेत, याबद्दल श्वेतपत्र जारी करावे, अशी मागणी काँग्रेसने बुधवारी केली आहे.देशातील दहा राज्ये दुष्काळाच्या खाईत सापडली आहेत. त्यात महाराष्ट्राचाही समावेश आहे. शेतकऱ्यांची अवस्था अतिशय वाईट असून गंभीर चिंतेची बाब बनली आहे. त्यांचे ऐकून घ्यायला कुणीही नाही, असे काँग्रेसचे प्रवक्ते मनु अभिषेक सिंघवी यांनी येथे म्हटले. लातूरला रेल्वेने पाणी पोहोचविण्यात आले, मात्र ते उंटाच्या तोंडात जीरे देण्यासारखे आहे. एकट्या लातूरला त्यापेक्षा शंभर पट जास्त हवे असून तरच लोकांची गरज भागू शकेल, असेही ते म्हणाले. दुष्काळ असतानाही मोदी सरकारने शेतकऱ्यांच्या मृतदेहांवर राजकारण चालविले आहे. मोदींचा डांगोरा पिटला जावा यासाठी पाणी पाठविल्या जाणाऱ्या रेल्वेवर प्रचारसामग्री लावली जात आहे.काय सांगते आकडेवारीमोदी सरकारच्या कारकीर्दीत वर्षभरात महाराष्ट्रामध्ये ३२२८ शेतकऱ्यांनी आत्महत्या केली आहे. देशातील २४३ जिल्हे दुष्काळग्रस्त घोषित करण्यात आले आहेत, मात्र शेतकऱ्यांना मदत देण्यात आलेली नाही. हे आम्ही नव्हे तर देशाच्या सर्वोच्च न्यायालयाने त्याबाबत सरकारची कानउघाडणी केलेली आहे. संपूर्ण देशातील शेतकऱ्यांच्या आत्महत्येची आकडेवारी देताना सिंघवी म्हणाले की, यातील ८३ शेतकरी महाराष्ट्रातील आहेत. त्यात प्रामुख्याने विदर्भ आणि मराठवाड्यातील शेतकऱ्यांचा समावेश आहे.
दररोज नऊ शेतकरी आत्महत्या
By admin | Published: April 14, 2016 1:01 AM