उत्तराखंड : उत्तराखंड विधानसभेचे अध्यक्ष गोविंदसिंग कुंजवाल यांनी रविवारी काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांना पक्षांतरबंदी कायद्यान्वये नोटीस बजावून, पक्षविरोधी कारवाया केल्याबद्दल तुमची आमदारकी रद्द का करू नये, अशी विचारणा केली आहे.या बंडखोर आमदारांना बजावण्यात आलेली ही तीन पानी नोटीस सर्किट हाऊसमधील संबंधित आमदारांच्या निवासस्थानांच्या बाहेर चिकटवण्यात आली आहे. पक्षाच्या व्हिपचे उल्लंघन करणे आणि भाजपशी हातमिळवणी केल्याबद्दल तुम्हाला विधानसभा सदस्यत्वापासून अपात्र का ठरविण्यात येऊ नये, अशी विचारणा या नोटीसद्वारे करण्यात आली आहे.तथापि भाजपच्या २६ आणि काँग्रेसच्या नऊ बंडखोर आमदारांसह ३५ आमदारांनी विधानसभा अध्यक्षांविरुद्ध अविश्वास प्रस्ताव दाखल केलेला आहे, असा दावा भाजपने केला. काँग्रेसचे मुख्य प्रतोद आणि विधिमंडळ कामकाजमंत्री इंदिरा हृदयेष यांच्या विनंतीवरून अध्यक्ष कुंजवाल यांनी नऊ बंडखोर आमदारांना ही नोटीस बजावली. उत्तराखंडचे राज्यपाल कृष्णकांत पॉल यांनी मुख्यमंत्री हरीश रावत यांना २८ मार्चपर्यंत आपले बहुमत सिद्ध करण्यास सांगितले आहे. (वृत्तसंस्था)
नऊ बंडखोर काँग्रेस आमदारांना नोटीस
By admin | Published: March 21, 2016 2:50 AM