दिल्लीमध्ये गेल्या 24 तासांमध्ये नऊ हत्या करण्यात आल्या. दक्षिण दिल्लीमध्ये एक व्यक्तीने त्याच्या तीन मुलांसह पत्नीचीही गळा चिरून खून केल्याने दिल्ली हादरली आहे. तर वसंतकुंजमध्ये एका वृद्ध दांपत्यासह त्यांच्या नोकराचीही हत्या केल्याने थरकाप उडाला आहे. यावर दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी सुरक्षेसाठी केंद्रीय गृहमंत्री, राज्यपाल आणि दिल्ली पोलिसांना जबाबदार धरले होते. आता त्यांनी या हत्यांसाठी कोणाला प्रश्न विचारावा असा प्रश्न पडल्याचे म्हटले आहे.
देशाची राजधानी दिल्लीची सुरक्षा व्यवस्था नेहमीच संशयाच्या भोवऱ्यात असते. दर दिवशी काही ना काही खून, चोऱ्या, बलात्कारासारख्या घटना घडत असतात. यासाठी कधी दिल्ली पोलिसांकडे कमी मनुष्यबळ तर कधी अन्य कारणे सांगितली जातात. मात्र, एवढे असूनही आजपर्यंत कोणतीही रणनीती बनविण्यात आलेली नाही.
आपच्या नेता आतिशी मार्लेना यांनी रविवारी सांगितले की, गेल्याच महिन्यात दिल्लीमध्ये 220 हून जास्त वेळा गोळीबाराच्या घटना झाल्या आहेत. यामध्ये अनेकांना जीव गमवावा लागला आहे. मात्र, केंद्र सरकार दिल्लीची सुरक्षा व्यवस्था सुधरविण्यात अपयशी ठरली आहे. महिलांना सायंकाळी घराबाहेर पडण्याची भीती वाटू लागली असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
दरम्यान, आपने विधानसभा निवडणुकीत दिल्लीभर तीन लाख सीसीटीव्ही कॅमेरांचे जाळे उभारण्याचे आश्वासन दिले होते. कारण तेव्हा निर्भया बलात्कार प्रकरणाने वातावरण तापलेले होते. अद्याप सीसीटीव्ही न लागल्यावरून भाजपा आपला नेहमीच कात्रीत पकडत आली आहे. मात्र, आपने सांगितले की सीसीटीव्ही बसविण्याचे काम वेगाने सुरु झाले आहे. पुढील तीन महिन्यांत शहरात तीन लाख सीसीटीव्ही लावण्यात येतील.