ऑनलाइन लोकमत
हावडा, दि. २५ - ऑस्ट्रेलिया, न्यूझीलंड, अमेरिकेपाठोपाठ भारतातही अनेकांना पोकेमॉन गो खेळाने झपाटून टाकले आहे. काहीजण या खेळाच्या इतके आहारी गेले आहेत की, पोकेमॉनला पकडण्यासाठी त्यांनी चक्क आपली नोकरी सोडली. कोलकात्यात अशीच एक घटना समोर आली आहे. कोलकात्याता हावडयामध्ये रहाणारा एक नऊ वर्षांचा मुलगा जास्तीत जास्त पोकेमॉनला पकडता यावे यासाठी घर सोडून मुंबईला यायला निघाला होता.
रविवारी सकाळी हावडा स्थानकात हा मुलगा पोलिसांना सापडला. हावडयापेक्षा मुंबईमध्ये पोकेमॉनला पकडणे अधिक सोपे असल्याचे मी ऐकले आहे असे या मुलाने पोलिसांना सांगितले. सध्या पोकेमॉन गो या खेळाची प्रचंड क्रेझ आहे. पोकेमॉन गो हा आभासी विश्व आणि वास्तव जग यांचा मेळ घडवून आणणआर ऑगमेंटेड रिएलिटी गेम आहे.
पोकेमॉन खेळासाठी घर सोडणारा हा मुलगा तिस-या इयत्तेत आहे. मित्राकडे जात आहे असे आईला सांगून शनिवारी संध्याकाळी हा मुलगा घराबाहेर पडला होता. या मुलाचे वडील लष्करात असून ते मालदामध्ये तैनात आहेत. रात्री नऊ वाजले तरी मुलगा घरी परतला नाही तेव्हा आईला चिंता वाटू लागली. आजू-बाजूला चौकशी केल्यानंतर तिने थेट हावडा पोलिस स्थानकात तक्रार दाखल केली.
पोलिसांनी हावडा रेल्वे स्थानक आणि गंगा घाटवर तात्काळ टीम्स पाठवल्या. रात्री एकच्या सुमारास हावडा रेल्वे स्थानकात पोलिसांना हा मुलगा फिरताना आढळला. पोलिसांनी चौकशी केली तेव्हा त्याने मुंबईची ट्रेन पकडण्यासाठी आपण थांबलो असल्याचे त्याने सांगितले.
हावडयापेक्षा मुंबईत जास्त पोकेमॉन पकडता येतील असे आपल्याला काकांनी सांगितले आहे असे या मुलाने पोलिसांना सांगितले. या मुलाला पोलिस स्थानकात आणून त्याच्या आईकडे सोपवण्यात आले. आपला मुलगा पोकेमॉन गो खेळामध्ये गुंतून गेला आहे असे आईने पोलिसांना सांगितले.