मित्र-मैत्रिणींसमोरच आई-वडील अभ्यासावरून ओरडल्यामुळे तामिळनाडूच्या तिरुवल्लूर जिल्ह्यातील नऊ वर्षांच्या शाळकरी मुलीने आत्महत्या केली. इयत्ता चौथीतील प्रतीक्षाने गेल्या सहा महिन्यांत सोशल मीडियावर जवळपास ७० रिल्स व्हिडीओ बनवले होते आणि मित्रवर्ग तसेच शेजाऱ्यांमध्ये ‘रिल्स क्वीन’ नावाने तिला ओळखले जायचे.
मंगळवारी रात्री ८च्या सुमारास प्रतीक्षा घराजवळच असलेल्या आपल्या आजीच्या घरासमोर मित्र-मैत्रिणींसह खेळत होती. तिचे आई-वडील कृष्णमूर्ती आणि करपगम तेथे आले आणि उशिरापर्यंत बाहेर खेळण्यामुळे तिला ओरडले आणि घरी जाऊन अभ्यास करण्यास सांगितले. घराच्या चाव्या देऊन आई-वडील घरातील काही आवश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी गेले.
तासाभरानंतर ते परतल्यावर घराचा दरवाजा आतून बंद होता. वारंवार आवाज देऊनही दरवाजा न उघडल्यामुळे तिच्या वडिलांनी दरवाजा तोडून आत प्रवेश केला असता प्रतीक्षा खिडकीच्या ग्रीलला गळ्यात टॉवेलने लटकलेली दिसली. तातडीने त्यांनी मुलीला रुग्णालयात नेले; पण तोपर्यंत उशीर झाला होता.
तिरुवल्लूर शहर पोलिसांनी गुन्हा दाखल करून तपास सुरू केला असला तरी, एका तपास अधिकाऱ्याने सोशल मीडियावर याचा ठपका ठेवला. अमर्याद इंटरनेटमुळे तरुणांच्या मेंदूवर बरेच काही बिंबवले जाते, तरुण मनांवर विनाशकारी परिणाम होत असल्याचे पोलिस म्हणाले. नेटकऱ्यांमध्येही ही घटना व्हायरल झाली असून, किशोरवयीन मुलांच्या आयुष्यात सोशल मीडिया, इंटरनेटच्या भूमिकेबाबत अनेक गंभीर प्रश्न उपस्थित होत आहेत.