थिरुवअनंतपुरम : वयाची ९३ वर्षे पार केलेली... हृदयरोगाचा त्रास... श्वास घेण्यास होणारी अडचण... ढासळत्या आरोग्याच्या अत्यंत खडतर वळणावर असतानाही केरळमधील आजोबांनी कोरोनाला हरविले. त्यांची ८८ वर्षांची पत्नी, तसेच मुलगा, सून आणि नातू असे पाचही जण आजारातून खडखडीत बरे झाले आहेत.
जागतिक आरोग्य संघटनेने ज्येष्ठ आणि दुर्धर आजार असलेल्या व्यक्तींना कोरोनाचा जास्त धोका असल्याचे जाहीर केले आहे. त्याला आजी-आजोबांनी खोटे ठरविले. अर्थात त्यांना बरे करण्यासाठी झटणाऱ्या केरळमधील कोट्टायम वैद्यकीय महाविद्यालयातील वैद्यकीय पथकाचाही मोठा वाटा आहे. पथानमथिट्टा येथील ९३ वर्षीय आजोबांचा मुलगा, सून आणि नातू फेब्रुवारीच्या शेवटच्या आठवड्यात इटलीहून परत आला होता. त्या सर्वांना कोरोनाची बाधा झाली होती. त्यांच्यामार्फत आई-वडिलांनाही कोरोनाची लागण झाली.
कोरोना ६० वर्षांवरील व्यक्तींसाठी अधिक घातक असल्याचे मानले जाते. त्यातच आजोबांना हृदयविकाराचा झटका येऊन गेलेला. त्यांना श्वास घेण्यातही अडचण येत होती. त्यामुळे त्यांना कृत्रिम श्वासोच्छ्वासप्रणालीवर (व्हेंटिलेटर) ठेवण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार करण्यासाठी ७ डॉक्टरांचे पथक, ४० वैद्यकीय कर्मचारी आणि २५ नर्सदेखील देखभालीसाठी हजर होत्या.
आजी-आजोबांनी सुरुवातीस उपचार घेण्यास मनाई केली होती. तसेच, घरी सोडण्याची विनंती केली होती. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी चांगल्या उपचारसेवेचे आश्वासन त्यांना दिले. त्यांच्यावर उपचार करणाºया एका नर्सलादेखील कोरोनाची बाधा झाली. केरळचे वैद्यकीयमंत्री के. के. शैलजा यांनी नर्सशी संवाद साधत संपूर्ण वैद्यकीय देखभालीची जबाबदारी घेतली.
तसेच, आजोबांसह त्यांच्या घरातील पाच व्यक्तीवंर तब्बल २४ दिवस उपाचार करण्यात आले. आता पाचही जण बरे झाले असून, त्यांना घरी सोडण्यात आले आहे. ‘कुटुंबातील पाचही व्यक्ती दोनशे टक्के बरे झाले असल्याचा विश्वास डॉ. आशिष मोहन आाणि शरत यांनी व्यक्त केला. पुढील दोन आठवडे त्यांना घराबाहेर पडण्याची सक्त मनाई आरोग्य विभागाने केली आहे.
माझी चूक झाली : आजोबांच्या मुलाची कबुली
केरळ सरकारचे मी आभार मानतो. त्यांनी घेतलेल्या काळजीमुळे मी कृतज्ञ आहे. मात्र, माझ्या निष्काळजीपणामुळे हे घडल्याची कबुली आजोबांच्या मुलाने दिली आहे. इटलीतील व्हेनिसवरून मी दोन वेगळ््या विमानांची सेवा घेत २९ फेब्रुवारी रोजी भारतात परतलो. मात्र, त्याची माहिती मी प्रशासनाला कळविली नाही.