नवी दिल्ली : आगामी लोकसभा निवडणुकीसाठी काँग्रेसकडून उमेदवारांची नववी यादी जाहीर करण्यात आली आहे. या यादीत बिहार, जम्मू-काश्मीर, कर्नाटक, महाराष्ट्र आणि तामिनाडूच्या एकूण 10 उमेदवारांची घोषणा करण्यात आली आहे.
महाराष्ट्रातील अकोलासाठी हिदायद पटेल, रामटेक किशोर गजभिये, चंद्रपूर सुरेश धानोरकर, हिंगोली सुभाष वानखेडे यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. हिदायद पटेल यांना काँग्रेसने दुसऱ्यांदा उमेदवारी दिली आहे. या जागेवरून वंचित बहुजन आघाडीचे नेते प्रकाश आंबेडकर लढणार होते. मात्र, त्यांनी सोलापूरमधून उभे राहण्याचा निर्णय घेतला आहे. तर चंद्रपूरमधून काँग्रेसने उमेदवार बदलला असून विनायक बांगडे यांच्याऐवजी शिवसेनेतून आलेल्या धानोरकरांना तिकिट दिले आहे. धानोरकर यांनी शिवसेनेच्या आमदारकीचा राजीनामा दिला होता.
काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी अर्थमंत्री पी चिदंबरम यांचे पूत्र कार्ती चिदंबरम यांना तामिळनाडूतील शिवगंगा मतदारसंघाची उमेदवारी देण्यात आली आहे. बिहारमधील किशनगंजसाठी मोहद जावेद, कटीहारसाठी तारिक अन्वर, पुर्नियासाठी उदय सिंह यांची नावे जाहीर करण्यात आली आहेत. तर जम्मू काश्मीरच्या बारामुल्लासाठी हाजी फारूक मीर आणि कर्नाटकमधील बेंगळुरु दक्षिण मतदारसंघासाठी बी के हरिप्रसाद यांचे नाव जाहीर करण्यात आले आहे.
दरम्यान, भाजपानेही नुकतीच 9 उमेदवारांची यादी जाहीर केली असून भंडारा- गोंदिया मतदारसंघासाठी भाजपकडून सुनील मेंढे यांना तिकीट देण्यात आले आहे.