Nipah Virus: रूग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीकांना समाजातून केलं जातंय बहिष्कृत
By ऑनलाइन लोकमत | Published: May 25, 2018 09:30 AM2018-05-25T09:30:58+5:302018-05-25T09:30:58+5:30
निपाह व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीकांना समाजातून बहिष्कृत केलं जात आहे.
कोची- निपाह व्हायरसमुळे होणाऱ्या रूग्णांच्या मृत्यूचा आकडा दिवसेंदिवस वाढतो आहे. दुसरीकडे या आजारामुळे सर्वसामान्य लोकांमध्ये भीतीचं वातावरणही वाढतं आहे. रिपोर्ट्सनुसार, निपाह व्हायरसचा संसर्ग झालेल्या रूग्णांवर उपचार करणाऱ्या परिचारीकांना समाजातून बहिष्कृत केलं जात आहे. इतकंच नाही, तर दफनभूमीतील कर्मचारी निपाहमुळे मृत्यू झालेल्यांचे मृतदेह दफन करायला टाळाटाळ करत आहे. टाइम्स ऑफ इंडियाने हे वृत्त दिलं आहे.
बुधवारी व गुरूवारी अशीच दोन प्रकरणं समोर आली. कोइकोडमधील पेरांबरा तालुक्यातील हॉस्पिटलमध्ये काही परिचारिकांना बसमध्ये प्रवेश केला. त्यावेळी बसमध्ये असलेल्या प्रवाश्यांनी त्या परिचारिकांना बसमध्ये येण्यापासून रोखलं. तसंच बसमधील इतर प्रवासी बसमधून उतरायला लागले. रिक्षाचालकही या परिचारिकांना रिक्शेमधून प्रवास करू द्यायला टाळाटाळ करत आहेत. दुसरं प्रकरण नदाक्कवूमधील आहे. नदाक्कवू पोलिसांनी गुरूवारी मावूर रोड जवळच्या एका स्मशानभूमीत काम करणाऱ्या दोन मजुरांविरोधात तक्रार दाखल केली. या मजुरांनी निपाहमुळे मृत्यू झालेल्या व्यक्तीचा मृतदेह दफन करायला नकार दिला होता.
दरम्यान, निपाह व्हायरसमुळे संपूर्ण केरळमध्ये दहशतीचं वातावरण आहे. हॉस्पिटल प्रशासनाने स्टाफ आणि रूग्णाशी संपर्कात असणारी लोक वेगळी केली आहेत.