रायपूर : माणसानं निसर्गाला हानी पोहोचवल्यामुळेच निपाह विषाणूचा फैलाव होतो, असं केंद्रीय आरोग्य आणि कुटुंब कल्याण मंत्री जे. पी. नड्डा यांनी म्हटलं आहे. केरळमध्ये अद्याप निपाह विषाणूचा कहर कायम आहे. यामुळे आतापर्यंत 16 लोकांचा मृत्यू झाला आहे. तर शेकडो जणांवर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. छत्तीसगडमधील रायपूरमध्ये नड्डा यांनी प्रसारमाध्यमांशी संवाद साधला. केंद्र सरकार केरळमधील स्थितीवर नजर ठेवून असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. 'माणसानं निसर्गाचं नुकसान केल्यामुळेच निपाहसारख्या विषाणूचा संसर्ग होतो. निपाह हे मानवनिर्मित संकट नाही. हा विषाणू निसर्गातूनच पसरतो,' असं नड्डा म्हणाले. निपाह विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांचं मॅपिंग करण्यात येत असल्याची माहिती त्यांनी यावेळी दिली. याशिवाय विषाणूचा संसर्ग झालेल्या रुग्णांच्या संपर्कात आलेल्या लोकांचंही मॅपिंग करण्यात आल्याचंही त्यांनी सांगितलं. 'निपाह विषाणूची बाधा झालेल्या रुग्णांपर्यंत 12 तासांमध्ये वैद्यकीय मदत पोहोचवली जात आहे. यासोबतच ऑल इंडिया इन्स्टिट्यूट ऑफ मेडिकल सायन्स (एम्स), सफदरजंग रुग्णालय पुण्यातील नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ वायरॉलजी आणि नॅशनल सेंटर फॉर डिजीज कंट्रोलचे डॉक्टर केरळच्या आरोग्य विभागाच्या संपर्कात असून त्यांना संपूर्ण सहकार्य करत आहेत,' असं नड्डा यांनी सांगितलं.
'माणसानं निसर्गाचं नुकसान केल्यामुळेच निपाह विषाणूचं थैमान'
By ऑनलाइन लोकमत | Published: June 05, 2018 3:41 PM