नवी दिल्ली – निपाह व्हायरसच्या ताज्या आकडेवारीनं केरळमध्ये खळबळ माजली आहे. राज्यात या व्हायरसचे आतापर्यंत ६ रुग्ण आढळले आहेत. या ६ रुग्णांपैकी २ रुग्णांचा मृत्यू झाला आहे. केरळमधील निपाह व्हायरसच्या धास्तीने शेजारील कर्नाटक राज्यही अलर्ट झाले आहे. केरळमध्ये अनावश्यक प्रवास टाळा असं सरकारकडून आवाहन करण्यात येत आहे. केरळमध्ये या व्हायरसवर नियंत्रण मिळवण्यासाठी इंडियन काऊन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चच्या नॅशनल इन्स्टिट्यूट ऑफ व्हायरोलॉजीची मोबाईल बायोसेफ्टी लेवलची लॅबोरेटरी कोझिकोडला पाठवली आहे.
या व्हायरसबाबत माहिती देताना केरळच्या आरोग्यमंत्री वीना जॉर्ज म्हणाल्या की, निपाह व्हायरसची पुष्टी झाली असून हा बांगलादेशचा व्हेरिएंट आहे. हा एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीपर्यंत संक्रमित करतो. यात मृत्यूदर अधिक असला तरी संक्रमण कमी आहे. मानवी मेंदूला नुकसान पोहचवणाऱ्या या व्हायरसचे संक्रमण रोखण्यासाठी शासनाकडून आवश्यक पाऊले उचलण्यात आली आहेत अशी माहिती त्यांनी दिली.
बांगलादेशी व्हेरिएंट किती धोकादायक?
जॉर्ज यांनी सांगितले की, निपाह व्हायरसचा बांगलादेशी व्हेरिएंट किलर आहे. याच्या संक्रमणाने मृत्यूचा धोका अधिक वाढतो. बांगलादेशी व्हेरिएंटचा मृत्यू दर ७० टक्के आहे. वेळीच हा व्हायरस रोखला नाही तर निपाह व्हायरस महामारीचं स्वरुप घेऊ शकतो. परंतु निपाहच्या बांगलादेशी व्हेरिएंटचे संक्रमण दर कमी असल्याने ते दिलासादायक आहे. म्हणजे हा व्हेरिएंट इतरांच्या तुलनेत कमी पसरतो.
निपाह व्हायरसमुळे कर्नाटकात अलर्ट
केरळमधील निपाह व्हायरसचा धोका लक्षात घेता कर्नाटक आरोग्य विभागाने मार्गदर्शक सूचना जारी केली आहे. ज्यात केरळमधील व्हायरस प्रभावित भागात अनावश्यक प्रवास करणे टाळा असं आवाहन जनतेला केले आहे. केरळच्या सीमावर्ती जिल्ह्यात दक्षिण कन्नड, चामराजनगर आणि म्हैसूर आणि कर्नाटक राज्य प्रवेश एन्ट्रीवर देखरेख वाढवण्यात आली आहे.