निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट!

By ऑनलाइन लोकमत | Published: September 16, 2023 10:20 AM2023-09-16T10:20:57+5:302023-09-16T10:21:38+5:30

केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे.

nipah virus icmr warn mortality rate higher than coronavirus kozhikode all school closed till 24th septemeber | निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट!

निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक, मृत्यूदर ४० ते ७० टक्के, ICMR कडून अलर्ट!

googlenewsNext

नवी दिल्ली:  कोरोना व्हायरसनंतर आता देशात निपाह व्हायसमुळे  (Nipah Virus) लोकांमध्ये भीतीचे वातावरण पसरले आहे. केरळमध्ये निपाह व्हायरसची प्रकरणे आढळताच वैद्यकीय संस्थांनी इशारा देण्यास सुरुवात केली आहे. दरम्यान, इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चने (ICMR) निपाह व्हायरस कोरोनापेक्षाही धोकादायक असल्याचे म्हटले आहे. तसेच, निपाह संसर्गामध्ये मृत्यूचे प्रमाण ४०-७० टक्के आहे, तर कोरोनामध्ये ते २ ते ३ टक्के आहे. कोरोना व्हायरसमुळे होणाऱ्या मृत्यूच्या तुलनेत हे प्रमाण जास्त आहे. 

केरळमध्ये सध्या निपाह व्हायरसचे सहा रुग्ण आढळले असून त्यापैकी दोन जणांचा मृत्यू झाला आहे. कोझिकोड जिल्ह्यातील सर्व शैक्षणिक संस्था २४ सप्टेंबरपर्यंत बंद ठेवण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. इंडियन कौन्सिल ऑफ मेडिकल रिसर्चचे महासंचालक राजीव बहल म्हणाले की, केरळमध्ये निपाह व्हायरसचा प्रसार रोखण्यासाठी सर्व प्रयत्न सुरू आहेत. सर्व रुग्ण संक्रमित रुग्णाच्या संपर्कात आहेत. परिस्थितीचा आढावा घेण्यासाठी आणि उपाययोजना सुचवण्यासाठी विविध क्षेत्रातील तज्ज्ञांचा समावेश असलेले केंद्रीय पथक कोझिकोड जिल्ह्यात पोहोचले आहे. कॉन्टॅक्ट ट्रेसिंग अंतर्गत १००० हून अधिक लोकांचा शोध घेण्यात आला आहे. 

याचबरोबर, राजीव बहल यांनी वारंवार हात धुण्यास आणि फेस मास्क घालण्यास सांगितले. ते म्हणाले "४-५ उपाय आहेत, त्यापैकी काही कोविड विरूद्ध केलेल्या उपायांप्रमाणेच आहेत. जसे की वारंवार हात धुणे, मास्क घालणे. निपाह व्हायरसचा प्रसार होण्याचे मुख्य कारण म्हणजे संक्रमित व्यक्तीच्या संपर्कात येणे आणि त्यानंतर इतर व्यक्तींचा दुसऱ्या व्यक्तीच्या संपर्कात येणे, जे संक्रमित व्यक्तीला भेटले आहेत. हे टाळण्यासाठी, विलिगीकरण फार महत्वाचे आहे. विलिगीकरण देखील संरक्षणाची एक पद्धत आहे. लक्षणे दिसू लागल्यास, त्या व्यक्तीने स्वतःला विलिगीकरण करावे आणि ताबडतोब डॉक्टरांशी संपर्क साधावा."

अँटीबॉडीजचे आणखी २० डोस खरेदी करणार 
दरम्यान, भारत निपाह व्हायरसवर उपचार करण्यासाठी ऑस्ट्रेलियाकडून मोनोक्लोनल अँटीबॉडीजचे आणखी २० डोस खरेदी करणार आहे. हा व्हायरस संक्रमित फळे, वटवाघळांच्या माध्यमातून माणसांमध्ये आणि डुकरांसारख्या इतर प्राण्यांमध्ये पसरू शकतो. जर व्यक्ती कोणत्याही संक्रमित प्राणी किंवा त्याच्या शरीरातील द्रव, जसे की लाळ किंवा मूत्र यांच्या जवळ आल्यास त्यांना संसर्ग होऊ शकतो. एकदा तो लोकांमध्ये पसरला की, हा आजार एका व्यक्तीकडून दुसऱ्या व्यक्तीमध्ये पसरू शकतो, असेही राजीव बहल म्हणाले.

Web Title: nipah virus icmr warn mortality rate higher than coronavirus kozhikode all school closed till 24th septemeber

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.