तिरुवअनंतपुरम - केरळमधील कोझिकोड येथील स्थानिक सध्या एका भयानक विषाणूमुळे (Virus) हैराण झाले आहेत. या भयानक विषाणूची लागण झाल्यानं तीन जणांचा मृत्यू झाला आहे. 'निपाह' असं या जीवघेण्या व अत्यंत दुर्मिळ विषाणूचं नाव आहे. दरम्यान, आणखी 25 जणांच्या रक्ताच्या तपासणीमध्ये 'निपाह' विषाणू असल्याचे निष्पन्न झाले आहे. या सर्वांना डॉक्टरांच्या देखरेखीखाली ठेवण्यात आले आहे. निपाह विषाणूमुळे आणखी लोक दगावली जाऊ नये, यासाठी केरळ सरकारनं केंद्र सरकारनं मदतीची मागणी केली आहे. या पार्श्वभूमीवर, केंद्रीय आरोग्यमंत्री जे.पी.नड्डा यांनी नॅशनल सेंटर फॉर डिसीज कंट्रोल (एनसीडीसी) पथकास केरळमध्ये जाऊन पाहणी करण्याचे आदेश दिले आहेत.
मिळालेल्या माहितीनुसार, एनसीडीसी पथक केरळमधील 'निपाह' विषाणूमुळे प्रभावित झालेल्या परिसराचा दौरा करणार आहे. तर दुसरीकडे, इंडियन मेडिकल असोसिएशन (आयएमए) ची कमिटी या विषाणूबाबतचे मूळ शोधण्याचं काम करत आहे. तर पुणे व्हायरोलॉजी इन्स्टिट्युटनं तपासणीसाठी घेतलेल्या रक्ताच्या तीन नमुन्यामध्ये निपाह विषाणू असण्याचा दुजोरा देण्यात आला आहे.
(केरळमध्ये निपाह व्हायरसमुळे 10 जणांचा मृत्यू, जाणून घ्या काय आहे निपाह व्हायरस?)
विषाणूचे नाव निपाह कसे पडले?जागतिक आरोग्य संघटनेनुसार (WHO), निपाह विषाणू हा वटवाघुळामुळे फळ-फुलांच्या माध्यमातून मनुष्य आणि जनावरांमध्ये पसरत आहे. 1998 साली मलेशियातील कांपुंग सुंगई निपाह परिसरातून या विषाणूबाबतची प्रकरणं समोर आली होती. यामुळे या विषाणूला 'निपाह' असे नाव देण्यात आले. सर्वात आधी डुकरांमध्ये याचा परिणाम पाहायला मिळाला होता. 2004मध्ये बांगलादेशात हा विषाणू मोठ्या प्रमाणात पसरला होता. केरळमध्ये प्रथमच निपाह विषाणू पसरल्याची माहिती समोर आली आहे.
निपाहची लागण झाल्याचे लक्षणंया विषाणूमुळे प्रभावित झालेल्या रुग्णांना श्वास घेणे त्रासदायक होते. मेंदूमध्ये जळजळ होते. योग्य वेळेत उपचार न झाल्यास रुग्णाचा मृत्यू होऊ शकतो.
लस उपलब्ध नाहीनिपाह विषाणूवर अद्यापपर्यंत प्राणी किंवा मानवांसाठी प्रभावी लस उपलब्ध झालेली नाही. या विषाणूची लागण होऊ नये यासाठी फळं विशेषतः खजूर खाणं टाळले पाहिजे. जमिनीवर पडलेली फळं खाणं शक्यतो टाळलं पाहिजे. आजारी डुक्कर तसंच अन्य प्राण्यांपासून दूर राहिले पाहिजे.