नवी दिल्ली - भालाफेकपटू नीरज चोप्रा यानं शनिवारी टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत इतिहास घडवला. १२५ वर्षांनंतर भारतीय खेळाडूनं अॅथलेटिक्समध्ये ऑलिम्पिक पदक जिंकले अन् तेही सुवर्ण... तांत्रिकदृष्ट्या अॅथलेटिक्समधील भारताचे हे पहिलेच ऑलिम्पिक पदक आहे. त्यामुळे देशाला मोठा आनंद झाला असून अभिमान वाटत आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदींपासून ते नीरजच्या गावाकडेही या विजयाचं सेलिबेशन होत आहे. नीरज हा विजयी सुवर्णक्षण कॅमेऱ्यात टिपण्यात आला आहे. या क्षणाचा साक्षीदार कोट्यवधी भारतीयांना होता आले नाही. मात्र, व्हिडिओतून हा क्षण तुम्हाला पाहता येईल.
नीरजने मोठ्या कष्टाने आणि सातत्य पणाला लावून हे यश मिळवले आहे. नीरजच्या या यशाचे आणि भारताच्या सुवर्णक्षणाचा व्हिडिओ आपणास येथे पाहायला मिळेल. त्यामध्ये, पळत पळत येऊन चपळाईने, अगदी छत्रपती शिवाजी महारांजांच्या मावळ्याच्या ताकदीने नीरजने भालाफेक केल्याचे दिसून येते. त्यानंतर, स्टेडियममध्ये केलेला जल्लोष आणि त्याच्या प्रशिक्षकांच्या चेहऱ्यावर उमटलेला आनंद हा क्षण अत्यानंद देणार आहे.
https://twitter.com/i/events/1423971534918455299?s=20
नीरजच्या या पदकाचे मोल भारतीयांसाठी खूप आहे. नीरजने हे पदक दिवंगत दिग्गज धावपटू मिल्खा सिंग यांना समर्पित केले. २३ वर्षीय भालाफेकपटू नीरजनं टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत ८७.५८ मीटर लांब भालाफेक करून सुवर्णपदक जिंकेल. त्यानं पहिल्या दोन प्रयत्नात ८७ मीटर अंतर पार केले अन् प्रतिस्पर्धी त्याच्या जवळपासही पोहोचले नाही. प्रजासत्ताकचे जाकूब व्हॅद्लेजच ( ८६.६७ मीटर) आणि व्हिटेझस्लॅव्ह ( ८५.४४ मीटर) यांनी अनुक्रमे रौप्य व कांस्यपदक पटकावले. या विजयानंतर नीरज म्हणाला, मी हे पदक मिल्खा सिंग यांना समर्पित करतो. ते जिथे कुठे असतील त्यांनी मला खेळताना नक्की पाहिले असेल, अशी मी आशा करतो.'', असे नीरजने म्हटले आहे.
नीरजच्या या विजयाचे सेलिब्रेशन त्याच्या हरयाणातील मूळ गावी होत आहे. नीरजच्या वडिलांच्या गळ्यात हार घालून त्याच्या कुटुंबीयांसमवेत गावकरी आनंद साजरा करत आहेत. नीरजच्या गावाकडे जल्लोषाचे वातावरण पाहायला मिळत आहे.