मुंबई: पंजाब नॅशनल बँकेतील (पीएनबी) तब्बल 11 हजार कोटींच्या महाघोटाळ्यामुळे चर्चेत आलेला उद्योगपती नीरव मोदी याच्याबद्दलच्या अनेक रंजक गोष्टी हळूहळू समोर येत आहेत. काही दिवसांपूर्वीच पंजाब नॅशनल बँकेने नीरव मोदी आणि इतर काही जणांविरोधात ४.४ कोटी डॉलरच्या घोटाळ्याप्रकरणी तक्रार नोंदवली होती. ही तक्रार दाखल होण्याच्या आठवडाभरापूर्वीच नीरव मोदी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यासोबत असल्याचे समोर आले आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी गेल्या महिन्यात दावोस येथील आर्थिक परिषदेला हजेरी लावली होती. भारतात गुंतवणूकदारांना आकर्षित करण्यासाठी यावेळी पंतप्रधानांसोबत नेहमीप्रमाणे राजकारणी आणि उद्योगपतींचे शिष्टमंडळही दावोसला गेले होते. या शिष्टमंडळात नीरव मोदी याचाही समावेश होता. मार्क्सवादी कम्युनिस्ट पक्षाचे नेते सीताराम येचुरी यांनी 23 फेब्रुवारी रोजी पंतप्रधान मोदी यांनी या शिष्टमंडळासोबत काढलेला फोटो ट्विटरवर शेअर केला आहे. यापूर्वी 2016 मध्येही नीरव मोदी यांनी केंद्रीय अर्थमंत्री अरूण जेटली यांच्यासोबत दावोसच्या आर्थिक परिषदेला हजेरी लावली होती. नीरव मोदींच्या या भाजपा कनेक्शनमुळे सत्ताधारी अडचणीत येण्याची शक्यता आहे. पंजाब नॅशलन बँकेकडून 31 जानेवारीला नीरव मोदींविरोधात तक्रार दाखल करण्यात आली होती. त्यापूर्वीच्या आठवड्यात नीरव मोदी दावोस परिषदेत होते. नीरव मोदींना हा घोटाळा उघडकीला येण्याची कुणकुण लागल्यामुळेच त्यांनी गेल्या आठवड्यातच देश सोडल्याची शक्यता आहे. त्यामुळे आता मोदी सरकारने याविषयी स्पष्टीकरण द्यावे, अशी मागणी सीताराम येचुरी यांनी केली आहे.
PNB Scam: गुन्हा दाखल होण्याच्या आधी नीरव मोदी होता PM मोदींसोबत
By ऑनलाइन लोकमत | Published: February 15, 2018 2:32 PM