नवी दिल्ली: पंजाब नॅशनल बँकेला तब्बल 12 हजार कोटींचा चुना लावून फरार झालेला हिरे व्यापारी नीरव मोदी याने ब्रिटनकडे राजकीय आश्रय देण्याची मागणी केली आहे. 'फायनान्शियल टाईम्स'ने भारतीय व ब्रिटीश अधिकाऱ्यांच्या हवाल्याने हे वृत्त दिले आहे. मात्र, ब्रिटनच्या गृह मंत्रालयाने आम्ही वैयक्तिक खटल्याची माहिती देऊ शकत नाही, असे सांगत याविषयी अधिक माहिती देण्यास नकार दिला.दरम्यान, नीरव मोदीने ब्रिटनकडे राजकीय आश्रय मागताना आपण राजकारणाचा बळी ठरल्याचा दावा केला आहे. तर भारतीय परराष्ट्र मंत्रालयाने आम्ही नीरव मोदीच्या प्रत्यार्पणासाठी न्यायसंस्थेच्या निर्देशांची वाट पाहत असल्याचे सांगितले. नीरव मोदीव्यतिरिक्त बँकांना हजार कोटींचा चुना लावून पसार झालेला विजय मल्ल्याही लंडनमध्ये असून त्यालाही पुन्हा भारतात आणण्याचा दबाव भारत सरकारवर आहे.नीरव मोदीने भारतातून पळ काढल्यानंतर भारत सरकारने त्याचा पासपोर्ट रद्द केला होता. तसेच राष्ट्रीय तपास यंत्रणेने लूक आऊट नोटीसही जारी केली होती. पोलिसांनी एकूण २५ जणांविरोधात गुन्हे दाखल केले होते. यामध्ये नीरव मोदी, मेहुल चोकसी, दोन बँक संचालक आणि नीरव मोदीच्या कंपनीतील तिघांचा समावेश होता.
मी राजकीय षडयंत्राचा बळी; नीरव मोदीची ब्रिटनकडे आश्रय देण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 11, 2018 9:31 AM