ED Action Against Nirav Modi:अंमलबजावणी संचालनालयाने (ED) फरारी हिरे व्यापारी नीरव मोदी याच्याविरोधात मोठी कारवाई केली आहे. ईडीने शुक्रवारी सांगितल्याप्रमाणे, नीरव मोदीशी संबंधित कंपन्यांची हिरे, दागिने आणि बँक ठेवींसह एकूण 253.62 कोटी रुपयांची मालमत्ता जप्त केली आहे.
केंद्रीय एजन्सीने एका निवेदनात म्हटले की, या सर्व जंगम मालमत्ता हाँगकाँगमध्ये आहेत. मनी लॉन्ड्रिंगच्या चौकशीचा भाग म्हणून या सर्व मालमत्ता जप्त करण्यात आल्या आहेत. नीरव मोदीच्या हाँगकाँगमधील मालमत्तेमध्ये एका खासगी तिजोरीत ठेवलेले हिऱ्यांचे दागिने आणि तेथील बँक खात्यांमधील रकमेचा समावेश आहे.
पीएमएलएच्या तरतुदींनुसार मालमत्ता जप्त मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायद्याच्या (पीएमएलए) तरतुदींनुसार नीरव मोदीच्या मालमत्तांची तात्पुरती जप्ती करण्यात आली आहे. नीरव सध्या ब्रिटनच्या तुरुंगात कैद असून, त्याच्याविरोधात मनी लाँडरिंग प्रतिबंधक कायदा, 2002 (पीएमएलए) अंतर्गत गुन्हा दाखल आहे. तो पंजाब नॅशनल बँकेच्या 2 अब्ज डॉलर्सच्या(सूमारे 6,498.20 कोटी) फसवणुकीतील तो मुख्य आरोपी आहे. या प्रकरणाचा तपास केंद्रीय अन्वेषण विभाग (CBI) करत आहे.