नवी दिल्ली - पंजाब नॅशनल बँकेला 13 हजार कोटी रुपयांचा चुना लावणारा हिरे व्यापारी नीरव मोदीचा आणखी एक घोटाळा समोर आला आहे. पीएनबी घोटाळा उघड झाल्यानंतर आणि नीरव मोदीविरोधात सीबीआयने गुन्हा दाखल केल्यानंतर त्याने त्याच्या डमी संचालकांसह 6 कंपन्या हाँगकाँगमधून काहिराला शिफ्ट केल्याची धक्कादायक माहिती उघडकीस आली आहे. हाँगकाँगमधील त्याच्या अनुरागन या डमी कंपनीचा संचालक दिव्येश गांधी याने तसा दावा केला असून या सहाही बनावट कंपन्यांच्या खात्याची जबाबदारी आपल्याकडे होती, अशीही कबुली गांधी यांनी दिली आहे.
घोटाळा उघडकीस आल्यानंतर अमेरिकेत राहणारा नीरव मोदीचा सावत्र भाऊ नेहल मोदीने सर्व डमी संचालकांचे मोबाइल फोन तोडून टाकले. त्यानंतर त्यांना हाँगकाँगवरून काहिराला शिफ्ट केले, अशी माहिती दिव्येश यांनी सांगितले. नीरव मोदीच्या या घोटाळ्यात दिव्येशला तपास यंत्रणेने साक्षीदार केले आहे. 'नीरवने शेल कंपनीच्या कर्मचाऱ्यांना ई-मेल सर्व्हिसद्वारे संशायस्पदरित्या व्यवहार करण्याचे निर्देश दिले होते. हे ई-मेल ठराविक काळाने आपोआप डिलीट होतात. त्यामुळे मागे काही पुरावे राहत नाहीत,' असंही दिव्येश यांनी सांगितले. या शेल कंपनी आणि नीरवचे काका मेहुल चौकसीच्या डमी कंपनींमध्ये आर्थिक व्यवहार झाला होता. हाँगकाँगच्या या सहा कंपन्यांचे पत्ते वेगवेगळे होते. मात्र सेल पर्चेस आणि आयात-निर्यातशी संबंधित कागदपत्रं एकाच ठिकाणी बनवले जात असल्याचं दिव्येश यांनी सांगितले. काही डमी संचालकांना त्यांच्या नावाचा वापर करण्यासाठी प्रत्येक महिन्याला 8000 रुपयांची रक्कम देण्यात आल्याचीही माहिती समोर आली आहे.