नवी दिल्ली - देशाच्या राजधानीत घडलेलं निर्भया बलात्कार प्रकरणातील आरोपींनी फाशीची शिक्षा लवकरात लवकर द्यावी यासाठी निर्भयाच्या आई-वडिलांनी कोर्टाकडे विनंती केली आहे. तर फाशी टाळावी यासाठी आरोपींकडून पुरेपूर प्रयत्न होताना दिसत आहेत. याचिकांची ढाल बनवत दोषी आरोपी फाशीच्या शिक्षेपासून दूर पळताना पाहायला मिळतंय.
शुक्रवारी या मुद्द्यावरुन कोर्टात दोषी आरोपी आपली बाजू मांडणार आहेत. तिहार जेलमधून व्हिडीओ कॉन्फरन्सद्वारे या आरोपींचं म्हणणं कोर्ट ऐकून घेणार आहे अशी माहिती तिहार जेल प्रशासनाने दिली आहे. सुप्रीम कोर्टात निर्भयाच्या आई-वडिलांनी याचिका दाखल केली आहे. त्यात दोषींना फाशीवर तातडीने लटकवावं अशी मागणी करण्यात आली आहे. तर आरोपींचे वकील ए पी सिंह यांनी सांगितले की, आमच्या तीन याचिका वेगवेगळ्या कोर्टात प्रलंबित आहेत. जोपर्यंत त्यांचा निकाल लागत नाही तोवर आरोपींना फाशी कशी देऊ शकतात? असा युक्तिवाद केला आहे.
तर निर्भयाच्या वकिलांनी दावा केला आहे की, या तीन याचिकांपैकी एकात चोरीचं प्रकरण आहे. कनिष्ठ न्यायालयात दोषी मुकेश आणि जूवेनाइनसह तिघांवर हा गुन्हा आहे. त्यात त्यांना १०-१० वर्षाची शिक्षा सुनावली आहे. ही घटना १६ डिसेंबर २०१२ च्या पूर्वी निर्भया सामुहिक अत्याचार होण्यापूर्वी झाली होती. मात्र या निर्णयाला उच्च न्यायालयात आव्हान दिलं आहे असं ए. पी सिंह यांनी सांगितले. दुसरी याचिका पवनच्या वयाची जोडलेली आहे. घटना घडली तेव्हा पवनला अल्पवयीन न मानल्याने त्याला आव्हान देण्यात आलं आहे.
तसेच तिसरी याचिका अक्षय कुमार याने सुप्रीम कोर्टात फाशीची काय गरज आहे असं सांगत या निर्णयाचा फेरविचार करावा अशी मागणी केली आहे. या सर्व याचिकांच्या पार्श्वभूमीवर ज्येष्ठ वकील राजीव मोहन यांनी सांगितले की, दया याचिका सोडून इतर तीन याचिका फाशीच्या शिक्षेच्या मध्ये येऊ शकतात. पवन अल्पवयीन होता की नाही याबाबतच्या याचिकेचा निकाल लागत नाही तोवर फाशी दिली जाऊ शकत नाही. तर चोरीचं प्रकरण वेगळं आहे त्याच्या याचिकेचा परिणाम फाशीच्या शिक्षेवर होणार नाही. तसेच अक्षय कुमारच्या पुनर्विचार याचिकेवरही फाशीची शिक्षा कमी होईल असं वाटत नाही.