नवी दिल्ली - २०१२ च्या निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणात दोषी ठरलेल्या चौघांना आज सकाळी फाशी देण्यात आली. मध्यरात्री पार पडलेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने फाशीच्या शिक्षेबाबत पुनर्विचार करण्यासाठी एका दोषीने दाखल केलेली याचिका शेवटच्या मिनिटाची फेटाळली. निर्भयाच्या दोषींना फासावर चढवल्यानंतर राजकीय स्थरातून प्रतिक्रिया येण्यास सुरुवात झाली. तसेच, बॉलिवूडमधील कलाकारांनीही आपलं मत व्यक्त केलं आहे. या फाशीच्या शिक्षेचं सर्वांनीच स्वागत केलं आहे. अभिनेता मनोज जोशी यांनी न्याय व्यवस्थेचा हा विजय असल्याचे म्हटले. मात्र, ४ ऐवजी पाचही नराधमांना फाशी व्हायला हवी होती, असेही त्यांनी म्हटले.
निर्भया सामूहिक हत्या आणि बलात्कार प्रकरणी दोषी अक्षय कुमार सिंग, पवन गुप्ता, विनय शर्मा आणि मुकेश सिंह या चार दोषींना पहाटे साडेपाच वाजता दिल्लीच्या तिहार तुरूंगात फाशी देण्यात आली. डिसेंबर २०१२ मध्ये निर्भया नावाच्या 23 वर्षीय वैद्यकीय विद्यार्थिनीवर सामूहिक बलात्कार आणि तिचा खून केल्याबद्दल चौघांना दोषी ठरविण्यात आले होते. याप्रकरणात न्यायालयाने ६ दोषींना फाशीची शिक्षा सुनावली होती. त्यापैकी राम सिंहनामक एका आरोपीने तुरुंगातच फाशी घेऊन आत्महत्या केली. तर, सहाव्या आरोपीला न्यायालयाने अल्पवयीन असल्याने ३ वर्षांची शिक्षा सुनावली. त्यामुळे याप्रकरणातील सहावा आणि अल्पवयीन असलेला आरोपी सध्या मुक्तपणे जीवन जगत आहे. निर्भयावर बलात्कार करण्यात आला, त्यावेळी याचे वय १७ वर्षे ६ महिने होते. त्यामुळे १८ वर्षांपेक्षा कमी वय असल्याने जुवेनाईल कोर्टात या आरोपीचा खटला चालला. त्यानुसार, ३ वर्षे शिक्षा भोगल्यानंतर तो आरोपी तुरुंगातून बाहेर आला आहे. मात्र, लोकांमध्ये त्याबद्दल प्रचंड राग असल्याने तो सध्या दक्षिण भारतातील एका जिल्ह्यात वेटरचे काम करत आहे. तसेच, स्वत:ची खरी ओळख लपवून तो राहत आहे. निर्भयावर अमानुष अत्याचार करण्यात हाच सर्वात पुढे होता. त्यामुळेच, यालाही फासावर लटकावले असते तर बर... अशी भावना आज व्यक्त होत आहे.
अभिनेता मनोज जोशी यांनी ट्विट करुन, अखेर न्यायव्यवस्थेचा विजय झाल्याचे म्हटले. तसेच, आशा देवी यांच्या संघर्षाला माझं नमन, आईपेक्षा मोठा कुठलाच योद्धा नाही, हे आशादेवी यांनी सिद्ध केलंय. देशातील इतर मुलींनाही असाच न्याय मिळेल. मात्र, ४ ऐवजी पाचही नराधमांना फाशी झाली असती तर बरं... असेही जोशी यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटलंय. दरम्यान, देशाचे पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी निर्भयाच्या दोषींना फाशी दिल्यानंतर ट्विटरवरून प्रतिक्रिया दिली आहे. न्याय जिंकला! महिलांचा सन्मान आणि सुरक्षितता अत्यंत महत्वाचे असून महिलांची प्रतिष्ठा आणि सुरक्षेची काळजी घेण्याला प्राधान्य असायला हवे अशी प्रतिक्रिया पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी ट्विटरद्वारे दिली आहे.