नवी दिल्ली - संपूर्ण देशाला हादरवणाऱ्या दिल्लीबलात्कार प्रकरणातील चार आरोपींना आज पहाटे तिहार कारागृहात फासावर लटकवण्यात आले. पहाटे साडेपाच वाजता जल्लादाने खटका ओढला आणि चारही आरोपींना फासावर लटकवले आणि गेल्या सात वर्षांपासून न्यायाची वाट पाहत असलेल्या दिल्लीतीत निर्भयाला न्याय मिळाला. आपल्या मुलीला न्याय मिळाल्यानंतर निर्भयाच्या आई-वडिलांनी प्रतिक्रिया दिली आहे. दोषींना शिक्षा झाल्याबद्दल त्यांनी आनंद व्यक्त केला आहे.
निर्भयाच्या वडिलांनी 'आज आमचा विजय झाला आहे. दिल्ली पोलीस, समाज आणि प्रसारमाध्यमांमुळे हे शक्य झाले आहे. या क्षणाची आम्ही मागील 7 वर्षांपासून वाट पाहत होतो. आज केवळ आमच्यासाठी नाही तर संपूर्ण देशासाठी मोठा दिवस आहे. आजचा दिवस हा न्यायचा दिवस आहे. निर्भया आज नक्कीच आनंदी असेल. आज आम्हाला खऱ्या अर्थाने शांती मिळाली' असं म्हटलं आहे. तसेच 'महिलांसंदर्भातील आरोपांमध्ये योग्य नियम बनवले पाहिजेत. त्यामुळे पीडितेच्या कुटुंबियांना अनेक वर्ष संघर्ष करावा लागणार नाही' अशी अपेक्षा देखील त्यांनी व्यक्त केली आहे.
निर्भया प्रकरणातील चारही दोषींना फाशी देण्यात आली आहे. या आरोपींना फाशी दिल्यानंतर राजधानी दिल्लीत उत्साहाचं वातावरण तयार झालं. अनेकांनी हा आनंद साजरा केला. आपल्या मुलीला न्याय मिळाल्यानंतर निर्भयाची आई आशा देवीही भावूक झाल्याचं पाहायला मिळालं. अखेर तुला न्याय मिळाला. हा दिवस देशातील मुलींना समर्पित आहे. मी न्यायालयीन व सरकारचे आभार मानते अशा शब्दात त्यांनी आपली भावना व्यक्त केली. यावेळी आशा देवी म्हणाल्या की, सर्वोच्च न्यायालयातून परत जाताना मी प्रथम माझ्या मुलीच्या फोटोला मिठी मारून तुला न्याय मिळाला आहे. आमच्या मुलीने जितका त्रास सहन केला आहे तो देशातील इतर कोणत्याही मुलीला होऊ नये. म्हणून आम्ही तिच्या मृत्यूनंतरही ही दीर्घ लढाई सुरुच ठेवली. त्यांना अखेर फाशी देण्यात आली, बलात्कार पीडित आरोपींना देशात प्रथमच फाशी देण्यात आली असं त्यांनी सांगितले.
गुन्हेगारांच्या वकिलांनी आपल्या अशिलांची फाशी वाचवण्यासाठी विविध कायदेशीर पर्यांय वापरून शिक्षेची अंमलबजावणी टाळण्यासाठी अखेरपर्यंत प्रयत्न केले. मात्र त्यांचे सर्व युक्तिवाद फेटाळून लावत सुरुवातीला दिल्ली उच्च न्यायालयाने आणि अखेरच्या क्षणी रात्री उशिरापर्यंत चाललेल्या सुनावणीनंतर सर्वोच्च न्यायालयाने शिक्षेला स्थगिती देण्यास नकार दिला. अखेरीस पहाटे साडेपाच वाजता ठराविक अधिकाऱ्यांच्या उपस्थितीत पवन जल्लाद यांनी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार खटका ओढला आणि विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, मुकेश कुमार सिंह आणि पवन गुप्ता या चारही आरोपींना फासावर लटकवले.
महत्त्वाच्या बातम्या
अखेर न्याय झाला! निर्भयाच्या चारही गुन्हेगारांना पहाटे तिहार कारागृहात फाशी
Nirbhaya Case: अखेर ‘तुला’ न्याय मिळाला; मुलीचा फोटो मिठीत घेत आई झाली भावूक, म्हणाली...
Nirbhaya Case:‘...तर भयंकर कृत्य करणाऱ्यांच्या मनात भीती निर्माण करण्याचा ‘हाच’ एकमेव पर्याय’
निर्भया बलात्कार प्रकरण : चारवेळा डेथ वॉरंट निघालेला देशातील एकमेव खटला
निर्भया अत्याचार: दोषींनी केली कोरोनाची 'ढाल'; न्यायालयात खेळली नवी चाल