नवी दिल्ली - 'जर आम्हाला फासावर लटकवून देशातील बलात्कार थांबणार असतील तर नक्कीच फाशी द्या. पण देशात बलात्कार थांबणार नाहीत असं विधान निर्भया बलात्कार आणि हत्या प्रकरणातील आरोपी विनय याने जेलच्या अधिकाऱ्यांशी बोलताना केलं आहे. निर्भयाच्या आरोपींना फाशी देण्यापूर्वी त्याने हे वक्तव्य केलं आहे.
निर्भया सामूहिक बलात्कारातील चार दोषींच्या डमीला बुधवारी सकाळी तिहार कारागृहात फाशी देण्याचा प्रयत्न करण्यात आला. जल्लाद पवनने हा प्रयत्न केला. काल मंगळवारी तिहार कारागृहात पोहोचलेल्या पवन जल्लादला देखील कोरोनाचा पार्श्वभूमीवर वैद्यकीय चाचण्या कराव्या लागल्या. कारागृहात पवन जल्लादची थर्मल स्कॅनरद्वारे तपासणी करण्यात आली, तसेच शारीरिक तपासणी केली गेली.
२० मार्च रोजी सकाळी ५.३० वाजता चारही आरोपींना फासावर लटकवण्यात येणार आहे. या आरोपींना सकाळी ३ वाजता उठवण्यात येईल. फाशी देण्यासाठी दोन तख्तावर चार दोर बांधण्यात आलेले आहेत. दरम्यान, गुरुवारी पुन्हा हे आरोपी फाशीची शिक्षा टाळण्यासाठी पटियाला हाऊस कोर्टात किंवा कलम ३२ अंतर्गत सुप्रीम कोर्टाचे दरवाजे ठोठावू शकतं. गुरुवारी दिवसभर न्यायालयीन कामकाज चालणार आहे. आरोपींची फाशीची शिक्षा टाळणं सध्यातरी शक्य नाही.
अधिकाऱ्यांचे म्हणणं आहे की, चारही आरोपींच्या मृतदेहाचं पोस्टमॉर्टम डीडीयू रुग्णालयात केलं जाईल. डॉक्टरांच्या पॅनलद्वारे पोस्टमॉर्टम करण्यात येईल. चारही आरोपींपैकी अक्षयचे नातेवाईक आजतागायत त्याला भेटण्यासाठी आले नाहीत. गुरुवारी दुपारी १२ पर्यंत अक्षयच्या नातेवाईकांना भेटण्याची परवानगी दिली जाऊ शकते. त्यानंतर दोषींना भेटण्याची परवानगी कोणालाही दिली जाणार नाही.
दरम्यान, फाशीच्या शिक्षेला स्थगिती मिळावी म्हणून विनय शर्मा, अक्षय सिंह ठाकूर, पवन गुप्ता या दोषींनी आंतरराष्ट्रीय कोर्टाचा दरवाजा ठोठावला होता. अशा प्रकारे फाशीची शिक्षा टाळण्यासाठी या दोषींकडून अत्यंत खालच्या थराला जाऊन प्रयत्न होत आहेत. या प्रकरणातील आरोपी मुकेश कुमार सिंह याने आता अजब दावा केला होता. निर्भयावर लैंगिक अत्याचार झाले त्यादिवशी मी दिल्लीत नव्हतो, असे सांगत मुकेश सिंह याने आपल्या फाशीची शिक्षा रद्द करण्याची मागणी कोर्टात केली होती. ही मागणी दिल्ली दिल्ली कोर्टाने फेटाळली. दोषी मुकेश कुमार सिंह याने आपल्या याचिकेत मला राजस्थानमधून ताब्यात घेण्यात आले. बलात्काराच्या घटनेच्या दुसऱ्या दिवशी म्हणजे १७ डिसेंबर २०१२ रोजी मला दिल्लीत आणण्यात आले. यानंतर तिहार कारागृहात माझा प्रचंड छळ करण्यात आला, असे नमूद केले आहे. मात्र, सरकारी वकिलांनी मुकेशचा हा आरोप दावा फेटाळून लावला होता.