नवी दिल्ली - डिसेंबर 2012 मध्ये राजधानी दिल्लीत झालेल्या निर्भया बलात्कारकांडामुळे संपूर्ण देश हादरला होता. दरम्यान, या घटनेवेळी पीडित निर्भयासोबत असलेल्या तिच्या मित्राबाबत एक धक्कादायक माहिती समोर आली आहे. देशाच्या राजधानीत धावत्या बसमध्ये निर्भयावर झालेल्या अमानूष अत्याचाराची क्रूरकहाणी ऐकवण्यासाठी तिच्यासोबत असलेला हा मित्र विविध वृत्तवाहिन्यांकडून हजारो रुपये उकळत होता, असा दावा एका ज्येष्ठ संपादकांनी केला आहे. तसेच मुलाखतीच्या बदल्यात पैसे घेताना त्याचे स्टिंग ऑपरेशन केले असल्याचा दावाही या संपादकांनी केला आहे. अजित अंजूम असे या संपादकांचे नाव असून, एका वृत्तवाहिनीचे संपादक असताना निर्भायाच्या मित्राच्या मुलाखतीच्या बदल्यात त्याच्यासमोरच त्याच्या काकांना 70 हजार रुपये दिले होते, असे ट्विट अजित अंजूम यांनी केले आहे. निर्भयावर झालेल्या सामुहिक बलात्काराच्या घटनेवर आधारित वेबसीरिज दिल्ली क्राइम पाहिल्यावर मी या घटनेबाबत सार्वजनिकरीत्या लिहिलं आहे,'असे ट्विट अजित अंजूम यांनी केले आहे. दिल्ली क्राइम या वेवसीरिजमध्ये निर्भयाच्या मित्राची भूमिक नकारात्मक दाखवण्यात आली आहे. दरम्यान, निर्भयाच्या मित्राने केलेल्या या कृतीबाबत तीव्र संताप व्यक्त केला आहे, ज्याच्या मैत्रिणीवर त्याच्या नरजेसमोरच असा क्रूर अत्याचार होतो. त्यात तिचा जीव जातो, असे चित्र पाहणारा माणून या घटनेची क्रूर कहाणी ऐकवून लाखो रुपये कमावण्यामध्ये गुंतला आहे, असे अंजूम यांनी आपल्या ट्विटमध्ये म्हटले आहे. काय आहे निर्भया गँगरेप प्रकरण?अल्पवयीन दोषीसह सहा जणांनी 16 डिसेंबर 2012 रोजी चालत्या बसमध्ये निर्भयावर बलात्कार केला होता. तसेच निर्भया व तिच्या मित्राला अमानुष मारहाण केली. यानंतर या दोघांना विवस्त्र रस्त्यावर फेकून त्यांच्यावर बस चालवण्याचा प्रयत्न केला. हे दोघं कित्येक तास विवस्त्र कडाक्याच्या थंडीत रस्त्यावर पडून होते. या दरम्यान रस्त्यावरुन जाणा-या काहींनी त्यांना काही कपडे दिली व हॉस्पिटलपर्यंत पोहोचवले. काही दिवसांनंतर निर्भयाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. या प्रकरणी दिल्ली उच्च न्यायालयाने चार दोषींना फाशीची शिक्षा सुनावली. त्यापैकी एक दोषी राम सिंहने जेलमध्येच आत्महत्या केली.निर्भया प्रकरणानंतर देशभरात संतापाची लाट उसळली होती. संसदेतही बलात्कारसंबंधी कायद्यात बदल करण्यात आले आणि कडक शिक्षेची तरतूद करण्यात आली. साकेत येथील फास्ट ट्रॅक कोर्टाने चारही आरोपींना सामूहिक बलात्कार आणि हत्या प्रकरणी दोषी ठरवलं होते. चौघांना फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. हे प्रकरण दुर्मिळातील दुर्मिळ असल्याचंही न्यायालयाने विशेष नमूद केलं होतं. कनिष्ठ न्यायालयाने शिक्षा नक्की केल्यानंतर हे प्रकरण उच्च न्यायालयाकडे सोपवण्यात आले. चारही आरोपींनीदेखील शिक्षेला उच्च न्यायालयात आव्हान दिले. उच्च न्यायालयाने 13 मार्च 2014 रोजी चारही आरोपी अक्षय ठाकूर, विनय शर्मा, पवन गुप्ता आणि मुकेश यांच्या याचिका फेटाळून लावल्या आणि फाशीच्या शिक्षेवर शिक्कामोर्तब केले.
संतापजनक! निर्भयावरील अत्याचाराची क्रूरकहाणी ऐकवण्यासाठी 'तो' वृत्तवाहिन्यांकडून घ्यायचा पैसे
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 9:30 AM