नवी दिल्ली - निर्भया सामूहिक बलात्कार आणि हत्याप्रकरणी फाशीची शिक्षा झालेल्या सहा पैकी चार दोषींना आज अखेर फासावर लटकविण्यात आले. न्यायव्यवस्थेसोबत गेल्या तीन, चार महिन्यांपासून सुरू असलेल्या खेळखंडोब्याला आज पूर्णविराम मिळाला. शेवटच्या रात्रीही या क्रूर नराधमांनी याचिकांवर याचिका करत फाशी टाळण्याचा प्रयत्न केला. यामुळे मुलीसाठी न्याय मागणाऱ्या आशा देवी यांच्या संयमाचा बांध फुटला होता. मात्र, त्यांच्यामागे देशवासियांबरोबरच एक वकील ठामपणे उभी राहिली होती. तिनेच या आरोपींचे सारे डावपेच मोठ्या कौशल्याने उधळून लावत फाशीच्या अंतिम क्षणापर्यंत साथ दिली. आज तिचे सोशल मीडियावर कौतूक होत आहे.
आज शुक्रवारी सकाळी ५.३० वाजता दोषींना फासावर लटकविण्यात आले आणि देशवासियांनी तिहार तुरुंगाबाहेर आणि उत्तर प्रदेशमध्ये पेढे वाटून ढोल वाजवायला सुरुवात केली. निर्भयाला ७ वर्षांनी न्याय मिळाला होता. या साऱ्या माहोलामध्ये #SeemaKushwaha हा हॅशटॅग ट्रेंड करत आहे. कोण आहेत या सीमा कुशवाहा? याच महिलेने उच्च न्यायालये, सर्वोच्च न्यायालयामध्ये ढाल बनून नराधमांच्या वकीलाला कडवी टक्कर दिली होती. सात वर्षे एखाद्या अती महत्वाच्या प्रकरणात रोज यश दिसत असताना अखेरच्या क्षणी अपयशाला सामोरे जावे लागत होते. तरीही कुशवाह यांनी त्यांच्या हार न मानता संयमाची सीमा ढळू दिली नाही.
सीमा कुशवाह या गेल्या सात वर्षांपासून निर्भयाची बाजू न्यायालयात मांडत होत्या. सामुहिक बलात्कारानंतर निर्भया आठवडाभर जगण्यासाठी झगडत होती. मात्र, तिची प्राणज्योत मालवली. यानंतर सीमा यांनी निर्भयाचा खटला कोणतीही फी न घेता लढण्याचा निर्णय घेतला. खालच्या कोर्टापासून ते वरच्या सर्वोच्च न्यायालयापर्यंत त्यांनी लढा दिला. सुरुवातीला हा लढा सोप असेल असे वाटले होते. कारण तत्कालीन सरकारने त्यासाठी कडक कायदा केला होता. मात्र, नंतर आरोपींच्या वकिलांनी एक-एक न्यायालयीन पळवाटा शोधत फाशी तब्बल ७ वर्षे लांबविली. तरीही सीमा या न डगमगता, न थकता केवळ दोषींना फासावर लटकविणार, या एकाच उद्देशाने लढत राहिल्या आणि अखेर जिंकल्या.या सीमा कुशवाहा यांच्या अभिनंदनाचे काही ट्विट