Swati Maliwal Case News:आपच्या राज्यसभा खासदार स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणीप्रकरणी दिल्ली पोलिसांनी मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांच्या पीएला अटक केली. याप्रकरणात विरोधक आणि सत्ताधारी यांच्यात आरोप-प्रत्यारोप होताना दिसत आहे. स्वाती मालिवाल प्रकरणात कठोर कारवाई व्हावी, अशी मागणीही करण्यात येत आहे. स्वाती मालिवाल यांना अन्य पक्षातूनही पाठिंबा मिळत आहे. यातच आता दिल्लीत गाजलेल्या निर्भया प्रकरणातील पीडितेच्या आईने स्वाती मालिवाल यांना पाठिंबा दर्शवला आहे.
स्वाती मालिवाल यांना झालेल्या कथित मारहाणी प्रकरणातील सीसीटीव्ही फुटेज समोर आले होते. यामध्ये मालिवाल या पोलिसांनाच अरेरावी करताना, नोकरी घालविण्याची धमकी देताना व आरामात चालताना दिसत आहेत. यामुळे एकूणच या प्रकरणाभोवती संशयाचे ढग निर्माण होऊ लागले आहेत. मालिवाल यांनी गंभीर आरोप केल्याने दिल्लीच्या राजकारणात खळबळ उडाली आहे. मात्र, यातच आता निर्भयाच्या आईने स्वाती मालिवाल यांना समर्थन दिले आहे.
दिल्लीचे सुपुत्र-भाऊ या नात्याने कठोर कारवाई करून न्याय द्यावा
या प्रकरणात दिल्लीचे मुख्यमंत्री अरविंद केजरीवाल यांनी कारवाई केली पाहिजे. ते दिल्लीचे मुख्यमंत्री आहेत, तसेच अन्य राज्यांतील जनतेचा विश्वासही त्यांच्यावर आहे. दिल्लीचा मुलगा आहे, भाऊ आहे, असे तेच म्हणत असतात. त्याच भाऊ आणि मुलाच्या नात्याने या प्रकरणावर त्यांनी बोलायला हवे. जे काही चुकीचे झाले आहे, त्यांच्याविरोधात कठोर कारवाई केली पाहिजे. स्वाती मालिवाल यांच्या पाठीशी उभे राहिले पाहिजे. स्वाती मालिवाल यांनी आठ ते दहा वर्ष त्यांच्यासोबत काम केले आहे. महिलांच्या प्रश्नांसाठी काम केले आहे. त्यांच्यामुळे अनेक महिलांची मदत झाली आहे. मी स्वतः अनेकवेळा त्यांच्याकडे महिलांचे प्रश्न घेऊन गेले आहे. आमच्या केससाठीही अनेकदा भेट घेतली आहे. चुकीचे झाले आहे, त्यावर कठोर कारवाई व्हायला हवी. स्वाती मालिवाल यांना न्याय मिळायला हवा, अशी मागणी निर्भयाच्या आईने केली आहे.
दरम्यान, निर्भयाच्या आईचा एक व्हिडिओ स्वाती मालिवाल यांनी एक्सवर शेअर केला आहे. तसेच, निर्भयाच्या आईने देशात न्यायासाठी दीर्घकाळ लढा दिला आहे. आरोपींना शिक्षा व्हावी यासाठी उपोषण करत असतानाही त्यांनी मला पाठिंबा दिला होता. आज जेव्हा त्यांनी माझ्या समर्थनार्थ हा व्हिडिओ बनवला. यामुळे भावुक झाले. पण यात काही मोठी गोष्ट नाही, आता काही नेते मला पाठिंबा दिल्याबद्दल त्यांना भाजपचे एजंट म्हणतील!, या शब्दांत या पोस्टमध्ये स्वाती मालिवाल यांनी भाष्य केले आहे.