नवी दिल्ली : निर्भया बलात्कार प्रकरणातील दोषी मुकेश याची दया याचिका केंद्रीय गृह मंत्रालयाने राष्ट्रपतींकडे पाठविली आहे. त्यामुळे मुकेशच्या या दया याचिकेवर आता राष्ट्रपती रामनाथ कोविंद अंतिम निर्णय देतील.
निर्भया बलात्कार प्रकरणातील सर्व दोषींना सुप्रीम कोर्टाने फाशीची शिक्षा सुनावली होती. मात्र, ही फाशी लांबणीवर टाकण्यासाठी आरोपी आपले सर्व उपाय अवलंबत आहे. फाशीची शिक्षा माफ व्हावी म्हणून या दोषींना राष्ट्रपतींकडे दयेची याचिका करण्याचा अधिकार आहे. त्यानुसार, या प्रकरणातील दोषी मुकेशची दया याचिका केंद्रीय गृहमंत्रालयाने गुरुवारी रात्री राष्ट्रपती रामनाथ कोविंद यांच्याकडे पाठविली आहे.
दरम्यान, या प्रकरणावर राजकारण करण्यात येत असल्याचा आरोप निर्भयाची आई आशा देवी यांनी केला आहे. "मी आतापर्यंत राजकीय चर्चा केली नाही. मात्र, आता सांगू इच्छितो की, ज्या लोकांनी 2012 मध्ये रस्त्यावर उतरून आंदोलन केले, तेच लोक आज माझ्या मुलीच्या मृत्यूवर राजकीय फायदा घेण्यासाठी खेळत आहेत", असे आशा देवी यांनी म्हटले आहे.
16 सप्टेंबर 2012 रोजी दिल्लीत एका अल्पवयीन मुलासह सहा जणांनी चालत्या बसमध्ये एका 23 वर्षीय तरुणीवर सामूहिक बलात्कार केला. यानंतर तिला बसमधून बाहेर टाकण्यात आले. या घटनेने संपूर्ण देश हादरला. या घटनेच्या निषेधार्थ देशाच्या विविध भागांमध्ये आंदोलने झाली. समाजाच्या सर्वच स्तरांमधून आरोपींना फाशीची शिक्षा देण्याची मागणी करण्यात आली.
या प्रकरणातील चार दोषींना (विनय शर्मा, मुकेश सिंह, पवन गुप्ता आणि अक्षय कुमार) फाशीची शिक्षा सुनावण्यात आली. या प्रकरणातील एक आरोपी राम सिंहने 2015 मध्ये तिहार जेलमध्ये आत्महत्या केली. तर एका अल्पवयीन आरोपीने तीन वर्षांसाठी बालसुधारगृहात ठेवण्यात आले होते. 2015मध्ये त्याची सुटका करण्यात आली.
आणखी बातम्या..
संजय राऊतांच्या निषेधार्थ संभाजी भिडेंकडून आज 'सांगली बंद'चे आवाहन
गुजरातवरून ठाण्याच्या दिशेने जाणारी प्रवासी लक्झरी बसला आग, चालक अन् प्रवासी सुखरूप
मध्य रेल्वे विस्कळीत; सायन-माटुंग्यादरम्यान रेल्वे रुळाला तडे
इस्रोची पुन्हा एकदा गगनभरारी, GSAT-30 उपग्रहाचे यशस्वी प्रक्षेपण